फ्रेण्डशीपच्या नावाखाली सेक्सची आॅफर

By admin | Published: April 6, 2017 02:11 AM2017-04-06T02:11:11+5:302017-04-06T02:11:11+5:30

फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचे बिंग फोडण्यात सायबर सेलला यश आले

Sex offer under the name of the frndscheep | फ्रेण्डशीपच्या नावाखाली सेक्सची आॅफर

फ्रेण्डशीपच्या नावाखाली सेक्सची आॅफर

Next

मुंबई : फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचे बिंग फोडण्यात सायबर सेलला यश आले. तीन विविध वेबसाईटवरुन हे सेक्स रॅकेट सुरू होते. या प्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत २ हजार जणांची फसवणूक करत त्यांना २० लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
मोहम्मद शकीब मलिक कोटवाला (२४), गिरीष हरबंश जैस्वाल (३३), कमल सुरेश विश्वकर्मा (३१), अर्जुन रामप्रकाश कनोजिया (२८) आणि शरीफ अफजल अहमद खान (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या कार्यालयातून १६ हार्डडिस्क, ३१० सीमकार्ड, ३ लॅपटॉप आणि ३७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट सुरूअसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू झाला. तपासात तीन वेबसाईट सापडल्या. फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली लाईफ टाईम मेंबरशिपची माहिती दिली जाते. तसेच हा क्लब सरकारमान्य असल्याची माहिती देण्यात येत असल्याने तरुण-तरुणींसह अनेक नामांकित मंडळींनी नोंदणी केली होती. फ्रेन्डशीप क्लबची लाईफटाईम मेंबरशीप घेतल्यानंतर सदस्याला एक आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर वेबसाईटसाठी काम करणाऱ्या महिला एजंट प्रत्येक दिवशी त्यांच्या ग्राहकांना मुली-मुले, स्त्री-पुरूष पुरविण्यासाठी सदस्यांना भेटून ठिकाण, वेळ सांगतात. ठरल्याप्रमाणे पाच तासांमध्ये आनंद घेण्यासोबतच काम करून ११ हजार रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत कमविण्याची संधी असल्याची जाहिरातही या वेबसाईटवरून करण्यात येत होती.
नोंदणीसाठी पेटीएमचा वापर केला जात होता. त्या आधारेच सर्व आर्थिक व्यवहार सराफाच्या खात्यातून सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने मुंबादेवी स्ट्रीट, दागिना बाजार परिसरातील या सराफाच्या दुकानाबाहेर सापळा रचून वेबसाईटसाठी काम करणाऱ्या एका सदस्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, मशिद बंदर परिसरातून आपले चार साथीदार ही वेबसाईट चालवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. सायबर पोलिसांनी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. (प्रतिनिधी)
।अशी ही बनवाबनवी...
फ्रेण्डशीप क्लब हा सरकार मान्य आहे. तसेच १० वर्षांपूर्वी महिलांनीच याची स्थापना केल्याचे ते सदस्यांना सांगत होते. भारतासह परदेशात ५० पेक्षा अधिक शाखा असूून तब्बल २२ हजार ४९७ महिला ग्राहकांसाठी होतकरू तरूणांची आवश्यकता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ९४९, ९६९ आणि ९९९ फी भरून क्लबमध्ये लाईफटाईम मेंबरशीपची संधी देण्यात आली होती. सदस्य झाल्यानंतर आपल्याला आवडत्या वयानुसार, हॉटेल/घरी अशा ठिकाणी आणि दिवसा/रात्री अशा तीन गटांमध्ये हे रॅकेट चालविले जात होते.
। मोहम्मद मास्टरमाईंड
उच्चशिक्षित असलेला मोहम्मद या टोळीचा मास्टरमाईंड आहे. त्याचा डाटा आॅपरेटिंगचा व्यवसाय आहे. यातूनच त्याने शक्कल लढवित ही टोळी सुरु केल्याचे तपासात समोर आले आहे. मोहम्मदने स्वत: एका वेबसाईटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्यात त्याची फसवणूक झाल्याचे त्याने अन्य मित्रांच्या मदतीने फसवणूकीचा धंदा सुरु केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.
।हॅप्पी कपलचीही आॅफर!
या वेबसाईटवर हॅप्पी कपल, तरुण मुले- मुली अशी विभागणी केली होती. दोन्हींच्या माध्यमातून ही मंडळी पुढे फसवणूक करत असल्याचे समोर आले. या टोळीचा संपूर्ण व्यवहार हा पेटीएमद्वारे होत असे. पेटीएमच्या माध्यमातून दिवसभरात नवीन नोंदणी करण्यात आलेल्या सदस्याकडून रक्कम घेतल्यानंतर टोळी तो नंबर बंद करायची. त्यामुळे यामध्ये अनेकांची फसवणूक होत.

Web Title: Sex offer under the name of the frndscheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.