विद्यार्थिनींचे लैैंगिक शोषण; आश्रमशाळेची मान्यताच रद्द

By admin | Published: November 5, 2016 06:23 AM2016-11-05T06:23:37+5:302016-11-05T06:24:38+5:30

आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चवथ्या इयत्तेतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस

Sexual exploitation of students; Approval of the ashram school canceled | विद्यार्थिनींचे लैैंगिक शोषण; आश्रमशाळेची मान्यताच रद्द

विद्यार्थिनींचे लैैंगिक शोषण; आश्रमशाळेची मान्यताच रद्द

Next


खामगाव (बुलडाणा) : आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चवथ्या इयत्तेतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आल्यानंतर, राज्य शासनाने शुक्रवारी तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द केली. तर, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दुपारी शाळेला भेट दिल्यानंतर येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचीही घोषणा केली.
या शाळेतील आणखी काही अल्पवयीन विद्यार्थिनी वासनांध कर्मचाऱ्यांच्या अत्याचारास बळी पडल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता चवथीमध्ये शिकत असलेल्या, जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील एका विद्यार्थिनीने, दिवाळीच्या सुटीत गावी गेल्यानंतर, शाळेत विद्यार्थिनींचे लंैगिक शोषण होत असल्याची तक्रार वडिलांकडे केली. हादरलेल्या वडिलांनी गुरुवारी हिवरखेड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह एकूण १३ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम ३७६, तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम (पॉस्को) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.
या गंभीर प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरणे सुरू केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पाळा येथे आश्रमशाळेस भेट दिल्यानंतर आरोग्य मंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दुसरीकडे गत काही दिवसांपासून सातत्याने विरोधकांचे लक्ष्य ठरलेले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही शुक्रवारी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर आणि भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यासह आश्रमशाळेस भेट दिली; मात्र त्यांना तेथे आदिवासी बांधवांच्या रोषास सामोरे जावे लागले. पाळा येथे पोहोचण्यापूर्वीच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले, तर थोडे पुढे जाताच आदिवासी बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी सावरा यांच्याकडे केली. आश्रमशाळेच्या भेटीदरम्यानही संतप्त नागरिकांनी सावरा व भाजपा सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.
आश्रमशाळेस भेट देऊन परतल्यानंतर खामगाव येथे पत्रकार परिषदेस संबोधित करताना, सावरा यांनी स्व. निंबाजी कोकरे आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची, तसेच ३० दिवसांत आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा केली. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)
>आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या घटनेबाबत असंवेदनशील विधान केलेले आहे. त्यांचे खाते आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात पुरते अपयशी ठरलेले असताना मुख्यमंत्री त्यांचा किती दिवस आणि का बचाव करीत आहेत? सावरांची तातडीने हकालपट्टी करा.
- राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
११ आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणातील एकूण १३ आरोपींपैकी ११ आरोपींना शुक्रवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
आदिवासी आश्रमशाळेतील अत्याचार पीडित विद्यार्थिनीला राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करेल. - पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री
>महिला अधिकारी करणार तपासणी
शासकीय वा अनुदानित आश्रमशाळांमध्ये महिला अधिकारी जातील आणि मुलींच्या तक्रारी जाणून घेतील. तसेच असुविधांची नोंद घेऊन त्या सरकारला सांगतील आणि त्यावर उपाययोजना करण्यात येतील. - देवेंद्र फडणवीस

Web Title: Sexual exploitation of students; Approval of the ashram school canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.