‘सरोगसी’ तपासणीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, ठाण्यातील रुग्णालयात घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:46 AM2017-08-21T04:46:42+5:302017-08-21T04:46:46+5:30
‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : ‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सरोगसी पद्धतीने मातृत्व मिळवण्यासाठी मुंबईच्या धारावीतील २१ वर्षीय महिला ठाण्याच्या नौपाड्यातील निर्मिती हॉस्पिटलमध्ये १८ आॅगस्ट रोजी उपचारासाठी आली होती. शुक्रवारी सकाळी तिची अपॉइंटमेंट असल्यामुळे ती डॉ. तांबे यांच्या केबिनमध्ये याच तपासणीसाठी गेली. तेथे सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास आपल्याच केबिनमध्ये या महिलेला त्याने विवस्त्र करून सरोगसी मदरची तपासणी करण्याऐवजी तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
तिची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर झाल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास ‘तुझे काही खरे नाही’ अशी दमदाटीही त्याने केली. प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत तिथून कशीबशी सुटका केल्यानंतर तिने या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने नौपाडा पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपनिरीक्षक आर.डी. शिंदे यांच्या मदतीने या महिलेचा जबाब नोंदवून चौकशी सुरू केली. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे.