लैंगिक छळ करणारे दोन्ही शिक्षक मोकाटच
By admin | Published: April 3, 2015 02:32 AM2015-04-03T02:32:46+5:302015-04-03T02:32:46+5:30
अकोला येथील नवोदय विद्यालयातगील प्रकार ; पोलीस पथके नागपूर, गोंदीयाकडे रवाना.
अकोला : येथून जवळच असलेल्या बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणारे दोन्ही शिक्षक अद्याप मोकाटच असून, त्यांच्या शोधार्थ गुरूवारी सायंकाळी दोन पोलीस पथके नागपूर आणि गोंदियाला रवाना झाली.
अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये कार्यरत आर. बी. गजभिये आणि शैलेश एस. रामटेके हे शिक्षक विद्यालयातील विद्यार्थिनींचा लैंगीक छळ करीत असल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४९ विद्यार्थिनींनी महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांना हा गंभीर प्रकार सांगितला. त्यानंतर डॉ. मिरगे यांनी २३ पालकांना सोबत घेऊन याची तक्रार पोलिसांकडे केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शिक्षक फरार झाले. दोघांच्या शोधात पोलिसांची दोन पथके गुरूवारी सायंकाळी रवाना करण्यात आली. सिव्हील लाईन्स पोलिसांनी आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके याच्याविरुद्ध कलम ३५४ अ आणि पॉस्को अँक्टच्या कलम ७, ८ (लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २0१२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.