मुंबईतील आरे परिसरात दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:06 AM2017-07-21T04:06:52+5:302017-07-21T04:06:52+5:30

‘पापा, मेरे साथ बलात्कार हुआ है...’ असे विषप्राशन केल्यानंतर परळच्या केईएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या १३ वर्षीय मुलाने वडिलांना सांगितले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Sexual harassment on two minor children in Aare area in Mumbai | मुंबईतील आरे परिसरात दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

मुंबईतील आरे परिसरात दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर ।लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘पापा, मेरे साथ बलात्कार हुआ है...’ असे विषप्राशन केल्यानंतर परळच्या केईएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या १३ वर्षीय मुलाने वडिलांना सांगितले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचसोबत ‘वो डॉन है, आप लोग घर बेचकर गाव चले जाओ...’ असे सांगत आपल्यासह १० वर्षीय मित्रावरही हा अत्याचार झाला आहे. त्याच लाजेखातर दोघांनीही विष प्यायल्याचे या मुलाने सांगितल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार आरेच्या फिल्टरपाडा परिसरात घडला असून, यातील दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुरुवारी पवई पोलिसांनी ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरेच्या मोरारजी नगरमध्ये आसिफ (नावात बदल) आणि सुनील (नावात बदल) ही दोन्ही पीडित मुले राहतात. यातील एक मुलगा १० वर्षांचा तर दुसरा १३ वर्षांचा आहे. १२ जुलै रोजी या मुलांनी उंदीर मारायचे विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र आसिफचा यात मृत्यू झाला तर सुनीलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे चार दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याचे यकृत उपचाराला साथ देत नसल्याने त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवसेना कार्यकर्ते भानुदास सकटे यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली असून, केईएमच्या अतिदक्षता विभागात सुनीलवर उपचार सुरू आहेत.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सुनीलच्या वडिलांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘१२ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. मी विचारपूस केली तेव्हा ‘मी उंदीर मारायचे विष प्यायलोय आणि मी ट्युशनला जाणार नाही...’ असे त्याने सांगितले. वारंवार विचारूनही त्याने कारण सांगितले नाही. त्यानंतर साकीनाका येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रुग्णालयाने सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर केईएममध्ये दाखल करण्यात आले. त्याचे यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.’
‘माझा मुलगा वेदनेने कण्हत होता. बुधवारी सायंकाळी तो सतत पाणी मागत होता. म्हणून आईने त्याला पाणी पाजले. तेव्हा फिल्टरपाडा परिसरात मी गेलो असता जाहिद/जहीर नावाचा एक इसम मला घेऊन गेला आणि त्याने दारे-खिडक्या बंद करून माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो आणि पुढे काय झाले हे मला माहिती नाही’, असे त्याने आईला सांगितले. त्याच्यासह त्याच्या मित्रासोबतही हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले,’ अशी माहिती त्यांनी दिली.

ट्युशन टीचरला आला होता संशय
सुनील गेल्या काही दिवसांपासून भेदरलेल्या अवस्थेत होता. ही बाब त्याच्या ट्युशन टीचरच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून याबाबत सांगितले. तसेच त्याचा मोठा भाऊदेखील त्याला वारंवार याबद्दल विचारत होता. मात्र त्याने भावालाही काहीच सांगितले नाही आणि अखेर विष प्यायला.

पीडित मुलाने विष घेतल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे तो काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. ज्या मित्रासोबत हा प्रकार झाल्याचे त्याचे म्हणणे आहे, त्याच्या घरच्यांनी याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.
- नवीन रेड्डी (पोलीस उपायुक्त)

Web Title: Sexual harassment on two minor children in Aare area in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.