सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार
By admin | Published: June 27, 2017 01:57 AM2017-06-27T01:57:50+5:302017-06-27T01:57:50+5:30
आपल्या सहकारी महिलेचे कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी देऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्या सहकारी महिलेचे कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
ही ३९ वर्षीय पिडीत महिला जालीसादगी यांच्याकडे कार्यालयात एकटी असतांना तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसारीत करण्याची धमकी दिली. तसेच काही गुंडांकडूनही तिला धमकावून १४ जानेवारी २०१७ आणि ६ फेब्रुवारी २०१७ रोजीही त्यांच्या नौपाड्यातील सिद्धार्थ अपार्टमेंट येथील कार्यालयातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकीही या ज्येष्ठ वकील महाशयांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २ डिसेंबर २०१६ ते ६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत घडलेल्या या प्रकाराने प्रचंड वैफल्यग्रस्त झाल्यानंतर काही सहकारी महिलांच्या मदतीने पिडीतेने या अत्याचाराविरुद्ध २५ जून २०१७ रोजी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी वकिल असलेल्या या आरोपीला रविवारी अटक केली.