दुष्काळात अन्नसुरक्षेची छाया
By admin | Published: August 25, 2015 02:19 AM2015-08-25T02:19:45+5:302015-08-25T02:19:45+5:30
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची
मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची मागणी केली जात नाही याचे कारण सर्व दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा योजना लागू केली
आहे. दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या लक्षावधींना अन्नसुरक्षेमुळे पोटाची चिंता भेडसावत नाही.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षेच्या धर्तीवर २ रुपये दराने गहू तर ३ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिले आहेत. बीडमध्ये १ लाख ७३ हजार, उस्मानाबादमध्ये १ लाख ६३ हजार, लातूरमध्ये १ लाख ११ हजार तर परभणीत १ लाख ६१ हजार लोकांना या योजनेमध्ये माणशी ५ किलो धान्य दिले जात आहे. दुष्काळाची तीव्रता वाढूनही लोकांचा स्थलांतर न होण्याचे किंवा नरेगावरील मजुरांची संख्या फारशी न वाढण्याचे अन्नसुरक्षेचे कवच हेच कारण असल्याचे अधिकारी मान्य करतात.
राज्यात सध्या दुष्काळी भागात १९०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यापैकी १२९१ टँकर्स मराठवाड्यात सुरू आहेत. गतवर्षी याच दिवशी राज्यात १५२४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मराठवाड्यात केवळ ७१८ टँकर्स सुरू होते. मराठवाड्यात ५० ते ६० कि.मी. अंतरावरून पाणी आणले जात आहे. अनेक धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५६२, उस्मानाबादेत १६४, लातूर ९८ एवढे टँकर सुरू आहेत.
प्रत्येक तालुक्यात किमान एक चारा छावणी सुरू करण्याचे आदेश दिले असून, सध्या पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी अथवा कर्नाटकातून चारा उपलब्ध करून दिला जात आहे. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत ११३१.३ मि.मी. पाऊस होतो. यंदा त्याच्या केवळ ४३.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी ५५३ मि.मी. म्हणजे ६४.३ टक्के पाऊस झाला होता. राज्यात सर्वांत कमी १७.६ टक्के पाऊस सोलापूरमध्ये तर सर्वाधिक ७७.७ टक्के पाऊस नागपूर येथे झाला आहे.
राज्यातील धरणांत सध्या केवळ
४८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सर्वांत बिकट स्थिती मराठवाड्यातील धरणांची आहे. राज्यातील २५५४ प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्याची क्षमता ३७ हजार ६४८ द.ल.घ.मी. असून त्यापैकी १८ हजार ०१९ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी २३ हजार १९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पांत ९ टक्के, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लघू प्रकल्पांत ५ टक्के असा एकूण फक्त ८ टक्केच पाणीसाठा आहे.