बंदुकीनं हवेत तीन फैरी झाडून शहीद गणेश ढवळेंना लष्कराची मानवंदना
By admin | Published: February 1, 2017 05:40 PM2017-02-01T17:40:50+5:302017-02-01T17:40:50+5:30
14 जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
वाई (सातारा ), दि. 1 - शहीद जवान गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर आज आसरे येथे 14 जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आसरे येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. शहीद जवान गणेश ढवळे यांचे पार्थिव वाई तालुक्यातील आसरे येथील निवासस्थानी आज सकाळी आणण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते.
अमर रहे अमर रहे गणेश ढवळे अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा वैभवनगर येथील स्मशानभूमीत पोहोचली. या ठिकाणी पालकमंत्री शिवतारे, आमदार पाटील, जिल्हाधिकारी मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख, पोलीस अधीक्षक पाटील यांनी वीरपिता किसन ढवळे यांचे सांत्वन केले. त्यानंतर वीरपिता किसन ढवळे, वीरपत्नी रेश्मा, वीर माता राधाबाई आणि वीर भगिनी जयश्री, भाग्यश्री आणि निर्मला यांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले.
12 मराठा लाईफ इन्फंट्री बटालियनच्या वतीने चिमण्णा मिरजी, 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, टीए बटालियन कोल्हापूर, 109 टीए बटालियनच्या वतीने सुभेदार देसाई, 56 आरआर बटालियनच्या वतीने श्रीनिवास पाटील, चीफ ऑफ आर्मी स्टाफ स्टेशन कोल्हापूर कमांडर कावेरी अप्पा यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. लष्कराच्या 14 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. शहीद गणेश ढवळे यांचे वडील किसन ढवळे यांनी पार्थिवाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी विविध अधिकारी, लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.