शॅगीच्या दोन लॉकर्सची माहिती उघड!
By admin | Published: April 20, 2017 05:58 AM2017-04-20T05:58:36+5:302017-04-20T05:58:36+5:30
बोगस कॉल सेंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या अहमदाबादेतील दोन बँक लॉकर्सची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे
ठाणे : बोगस कॉल सेंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या अहमदाबादेतील दोन बँक लॉकर्सची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. लॉकर्समध्ये काय आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
करवसुलीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने आॅक्टोबर २०१६ मध्ये केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शॅगी तब्बल ६ महिन्यांनंतर पोलिसांच्या हाती लागला. गत १० दिवसांच्या चौकशीत पोलिसांनी त्याला ‘बोलते’ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना अपेक्षित यश मिळाले नाही. शॅगीची मालमत्ता, सर्व व्यवहार अहमदाबादेत असल्याने गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तेथे मुक्कामी आहे. चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांना शॅगीच्या बँक लॉकर्सची माहिती मिळाली. अहमदाबादेतील एका बँकेत त्याच्या नावे २ लॉकर्स आहेत. या लॉकर्समध्ये काय आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अहमदाबादेत मुक्कामी असलेले ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लॉकर्सची पाहणी करणार आहे. अहमदाबादेतील शॅगीच्या इतर कंपन्या, या कंपन्यांमधील त्याचे भागीदार आणि इतर व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत शॅगीचे काही व्यवहार तपासले. जानेवारी २०१६ पासून त्याने सुमारे ३.५० कोटींची उलाढाल केल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)