शहादा दंगल प्रकरणी तिसरा गुन्हा दाखल
By admin | Published: December 4, 2014 02:46 AM2014-12-04T02:46:23+5:302014-12-04T02:46:23+5:30
सोमवार व मंगळवारी झालेल्या दंगलीस जबाबदार असलेल्या नऊ आरोपींविरूद्ध मंगळवारी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला.
शहादा (नंदुरबार) : सोमवार व मंगळवारी झालेल्या दंगलीस जबाबदार असलेल्या नऊ आरोपींविरूद्ध मंगळवारी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला. यापूर्वी दंगलीप्रकरणी ६० आरोपींविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
व्हॉटस् अॅपवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर सोमवार व मंगळवारच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी सल्लू, नमा, छोटू रिक्षावाला, सलीम रिक्षावाला, वसीम, इरफान रिक्षावाला, परवेझ, फरिद पठाण मोबाईलवाला, साजिद अहमद व इतर ४० ते ४५ जणांनी २ डिसेंबरला हातात लाठ्या घेवून व आरडाओरड करत पोलिसांच्या कामात अडथळा आणला. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली
व सरकारी वाहनांचे नुकसान
केले, असे हेड कॉन्टेबल रमेश पाटील यांनी बुधवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)