Presidential Election 2022: “शिंदे-फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केलाय, द्रौपदी मुर्मू यांना २०० हून जास्तच मते मिळतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:39 PM2022-07-18T13:39:12+5:302022-07-18T13:39:34+5:30
Presidential Election 2022: माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना २२ तारखेला शुभेच्छा देईन, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई: राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्तासंघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचे मतदान आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना आमदारांची दोनशे मते मिळवून देऊ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला असताना आणि त्यांच्या जोडीला राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत चमत्कार करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याने उद्याच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटतील का याबाबत कमालीची उत्सुकता आहे. यातच आता शिंदे-फडणवीस यांनी अगदी योग्य नियोजन केले असून, २०० नाही, तर जास्तच मते द्रौपदी मुर्मू यांना मिळतील, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
विधिमंडळात मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीनं आखणी केली असेल त्यापद्धतीने २०० किंवा त्यापेक्षा अधिक मते द्रौपदी मुर्मू यांना पडतील. व्यक्तीश: मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजकीय डावपेचावर विश्वास आहे. ते २०० चा आकडा पार करतील असा मला विश्वास वाटतो, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
आता कशाला ती स्टाइल, बंद करूया.
देशाच्या नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन तुम्ही तुमच्या स्टाइलमध्ये कसे कराल असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी शहाजी बापू पाटील यांना विचारले. त्यावर शहाजी यांनी नव्या राष्ट्रपतींना मी आता नाही २२ तारखेला शुभेच्छा देईन असे म्हटले. माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना मी २२ तारखेला शुभेच्छा देईन आणि आता कशाला ती स्टाइल. बंद करूया. कटाळा आलाय. महाराष्ट्रातील माणसे आता कंटाळतील. याचे आता दररोज कुठे ऐकायचे म्हणतील, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
VIDEO: 'कशाला ती स्टाईल आता, बंद करूया, कटाळा आलाय', खुद्द शहाजी बापूच म्हणाले.. बस्स झालं!
दरम्यान, भाजप-शिंदे गटाकडे आता १६७ संख्याबळ आहे. जगताप, टिळक मतदानाला येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ १६५ चे संख्याबळ असेल. २०० चा आकडा गाठायचा तर ३५ मते लागतील. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे हा आकडा १८० इतका होईल. २०० चा जादुई आकडा गाठण्यासाठी आणखी २० आमदारांची मते लागणार आहेत.