“एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही”: शहाजीबापू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:01 IST2024-12-13T15:01:28+5:302024-12-13T15:01:43+5:30
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडेन आणि दिलेल्या संधीचे सोने करेन, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

“एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही”: शहाजीबापू पाटील
Maharashtra Politics News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतमहायुतीचा निर्णय झालेला नाही. खातेवाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहे. यावरून आता शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, यावेळी १५ ते २० मंत्र्यांचाच शपथविधी होण्याची शक्यता आहे. यात भाजपाचे आठ ते दहा, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येक चार ते पाच मंत्री असू शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदेसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचे समजते. अजित पवार गटाला अर्थ खाते देण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदे जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते, खुर्चीचे महत्त्व नाही
भाजपा आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु, एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात महत्त्व राहिलेले नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते आहेत. बॅलेट पेपरवर घ्या. ईव्हीएम मशीनवर निवडणुका घ्या. अजून कुठलेही संशोधन करा. पण, संजय राऊत तुमचे घर भुईसपाट झाले आहे. त्यातील पत्रा-विटा काही चांगले असतील तर गोळा करा आणि झोपडे बांधा. या संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले. आता उरल्या सुरल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळे केल्याशिवाय काय आता गप्प बसत नाही, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
दरम्यान, विधानसभेला झालेल्या दारुण पराभवामुळे विरोधकांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. घराबाहेर पडून राजकारणात पुन्हा कसे यायचे, यासाठी हा शोधलेला मार्ग म्हणजे ईव्हीएमवरील आक्षेप आहे, असे सांगत पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदे पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडेन आणि दिलेल्या संधीचे सोने करेन, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.