शिवसैनिकांनी 'सामना'तील 'मोस्ट वॉन्टेड'च्या घराची केली तोडफोड, शिवसेनेविरोधात केली होती पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:44 PM2017-08-24T17:44:54+5:302017-08-24T17:46:04+5:30
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती.
शहापूर, दि. 24 - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी शहाच्या शहापूर येथील घराची तोडफोड केली.
नुकत्याच पार पडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या एकहाती विजयावर तिखट प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक भाजपाने 'मनी आणि मूनी ' यांच्या जोरावर जिंकल्याचा आरोप केला होता. गुजराती समाजात असंतोष पसरल्याचे वातावरण निर्माण झाले असताना खुश शहाच्या घराची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
आज शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त देखील मोस्ट वॉन्टेड या मथळ्याखाली हा खुश शहा कुठे कुणालाही दिसल्यास सामनाच्या कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी दुपारी १२ . ४० वाजताच्या दरम्यान अचानक जमा झालेल्या शिवसैनिक शहाच्या घरावर हल्लाबोल केला. मुंबई आणि ठाण्यातूनही आज काही शिवसैनिक शहापूरमध्ये दाखल झाले होते. मराठी द्वेषाचे कारणही विचारण्याचा प्रयत्न केला ; परंतू स्वतः खुश शहा हा घरात आढळून आला नाही. शिवसैनिकांच्या हल्ल्यात शहाच्या घराचे नुकसान झाले असून काही शिवसैनिकांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि मराठी माणसाबद्धल अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या खुश शहा याच्याविरुद्ध मुंबईतील सायबर सेल गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा, माधव भंडारी यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर-
राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे,असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी दिले.
सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तुलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशा शब्दांमध्ये भंडारींनी शिवसेनेवर टीका केली.
त्यांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल, असा टोला त्यांनी हाणला.