शहीद चंद्रकांत गलंडे अनंतात विलीन
By admin | Published: September 20, 2016 01:17 PM2016-09-20T13:17:20+5:302016-09-20T13:19:36+5:30
उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले माण तालुक्यातील जाशी येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलंडे यांच्यावर मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
dir="ltr">
आॅनलाईन लोकमत
पळशी (सातारा), दि. २० - उरी येथे रविवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले माण तालुक्यातील जाशी येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलंडे यांच्यावर मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘भारत माता की जय...’, ‘चंद्रकांत गलंडे अमर रहे’च्या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला.
चंद्रकांत गलंडे शहीद झाल्याचे समजल्यापासून ग्रामस्थांचे डोळे त्यांच्या पार्थिवाकडे लागले होते. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी जाशीला भेट देऊन गलंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
चंद्रकांत गलंडे यांचे पार्थिव पुण्याहून सोमवारी मध्यरात्री बारा वाजता सातारा येथे लष्कराच्या वाहनाने आणण्यात आले. साताºयात सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राजेंद्र जाधव, दादासाहेब जमदाडे यांनी मानवंदना दिली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
गलंडे यांचे पार्थिव गोंदवले मार्गे जाशी या मूळगावी मंगळवारी सकाळी पावणेनऊला आणले. फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनांतून अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी काही काळ पार्थिव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात आले. त्यानंतर गलंडे वस्ती येथील त्यांच्या घरी सुमारे दीड तास पार्थिव ठेवण्यात आले.
चंद्रकांत गलंडे यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ, ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी आई-वडील, पत्नी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. वस्तीवरच चंद्रकांत गलंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत यांच्यापेक्षा मोठा भाऊ मंज्याबापू यांनी मुखाग्नी दिला.
शासनाच्या वतीने पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी कर्नल राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे, तहसीलदार सुरेखा माने, आमदार जयकुमार गोरे आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
तीन फैरी झाडून मानवंदना
पार्थिवासोबत आलेल्या लष्करी जवानांनी बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून शहीद चंद्रकांत गलंडे यांना मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देण्यात येत होत्या.