शहीद पांडुरंग गावडेंचे पार्थिव थोडय़ाच वेळात गोव्यात होणार दाखल
By admin | Published: May 24, 2016 12:08 AM2016-05-24T00:08:15+5:302016-05-24T00:11:30+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत शहीद झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव विमानातून श्रीनगरहून दिल्ली व त्यानंतर
Next
>मंगळवारी सायंकाळी होणार आंबोली येथे अंत्यसंस्कार
श्रीनगर/वास्को : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत शहीद झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव विमानातून श्रीनगरहून दिल्ली व त्यानंतर दिल्लीहून गोव्यात दाबोळी विमानतळावर व नंतर पणजी येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दाखल होत आहे. दिल्ली येथून विमानाला उशिर झाल्यामुळे पार्थिव दाबोळी विमानतळावर येण्यास विलंब होत असल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले.
लष्करातर्फे मडगाव येथील तळावरील नायक सुभेदार प्रेम सिंग हे गावडे यांचे पार्थिव स्वीकारण्यासाठी दाबोळी विमानतळावर उपस्थित आहेत. रूग्णवाहिका व लष्कराच्या गाडय़ांचा ताफाही या ठिकाणी आहे. गावडे यांचे पार्थिव पणजीतील लष्कराच्या सिग्नल टू ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेथून मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील सातार्डा येथे पार्थिव नेण्यात येईल. तेथे मराठा बटालियनचे साता-यातील अधिकारी तेथे ताबा घेतील व सायंकाळी आंबोली येथे शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र असलेले पांडुरंग गावडे हे मराठा लाईट इन्फ्रन्टीच्या 41 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. उपचारावेळी गावडेंचा मृत्यू झाला.