शहापाडा, आंबेघर, हेटवणे धरणे ओव्हरफ्लो
By Admin | Published: August 4, 2016 02:25 AM2016-08-04T02:25:12+5:302016-08-04T02:25:12+5:30
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली आहे.
पेण : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली आहे. पेणमध्ये यंदा पाऊस जोरदार झाला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पेणमधील शहापाडा, हेटवणे, आंबेघर ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पेणवासीयांमध्ये समाधान व्यक्त होते.
शिवारात भातपिकांची व्यवस्थित लागवड झाली आहे. पावसाने जुलै महिना संपताक्षणीच सरासरी ओलांडली असून आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये होणारा पाऊस १०७ टक्के किंबहुना त्यापेक्षाही जास्त होण्याची दाट शक्यता आहे.
हवामान खात्याच्या सर्वेक्षणानुसार १९७० पासून ४६ वर्षात ३४ वेळा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. मात्र गेल्या दहा वर्षाचा विचार केल्यास तर २०१० आणि २०१३ साली जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठून ओलांडली होती.
गेली दोन वर्षे पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. मात्र यंदा देशभरात पाऊस चांगला होणार हे हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे, तलाव व धरणे तुडुंब भरून वाहू लागली. रायगडात तर पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. दक्षिण रायगडात तर पावसाने हाहाकार माजवला आहे.
सह्याद्री पर्वतरांगातील उगम पावणाऱ्या सर्वच नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. पाऊस थांबण्याची चिन्हे न दिसता तो अधिकच वाढत आहे. गतवर्षी प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस यावर्षी मात्र धुवाधार पडत आहे.
पेणच्या भोगावती, पाताळगंगा, बाळगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढत होतच आहे. मात्र समुद्राला उधाण भरती असल्याने ओहोटीच्या वेळेत वेगवान प्रवाही पाण्यामुळे पावसाचे पाणी खाड्यातून वेगाने समुद्राला जावून मिळते. पेण परिसरात यावर्षीचा जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडून देखील खारेपाटातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. मात्र जोरदार पावसाचा इतरत्र कुठेही परिणाम जाणवला नाही. जाणवला तो महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची झालेली चाळण ही बाब वगळता एकंदर परिस्थिती सामान्य आहे. मात्र तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणांच्या विसर्ग होणारा, पाणीसाठा आॅगस्टमध्ये पडणारा पाऊस असाच राहिला तर धोकादायक ठरू शकतो. भातशेतीमध्ये पाणी साचल्याने रोपे कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)