कोल्हापूरच्या शाहिराची मॉरिशसमध्ये ललकारी
By admin | Published: February 5, 2017 12:58 AM2017-02-05T00:58:48+5:302017-02-05T00:58:48+5:30
शिवजयंतीला कार्यक्रम : शिवशाहीर राजू राऊत यांच्या पथकाला संधी
कोल्हापूर : कोल्हापूरचा शाहीर आता सातासमुद्रापार मॉरिशसमध्ये ललकारी देणार आहे. यंदाच्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) येथील शिवाजी पेठेतील शिवशाहीर राजू राऊत हे तिथे शिवरायांचा पोवाडा गाणार आहेत. महाराष्ट्राची अस्सल लोककला असलेल्या शाहिरी पथकाला एखाद्या देशाने कार्यक्रम करण्यासाठी संधी देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
शाहीर राजू राऊत यांच्या पोवाडा सादरीकरणाच्या अनेक क्लिप्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्या पाहून मॉरिशसमधील मराठी साहित्य फौंडेशनतर्फे गेली पाच-सहा वर्षे त्यांना शाहिरी कला सादर करण्याचे निमंत्रण येत आहे; परंतु काही अडचणींमुळे त्यांना जाणे शक्य झाले नव्हते. यंदा मात्र त्यांचा डफ तिथे कडाडणार आहे.
शाहीर राऊत हा अत्यंत हरहुन्नरी कलावंत आहे. तो नुसता शाहीर नाही. व्यवसायाने चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर आणि गेली वीस वर्षे शाहिरी पथकाच्या माध्यमातून तो कार्यरत आहे. त्याशिवाय पोवाडे, शाहिरी गीते, छक्कड, लावणी, अभंग, ओव्या, कथा अशा विविध प्रकारांत त्यांनी दोन हजारांहून जास्त पानांचे लेखनही केले आहे.
डफ, ढोलकी, तुणतुणे, झांज आणि दिमडी असा पाच कलावंतांचा संच त्यांच्यासोबत जाणार आहे. त्यांना भार्गव कांबळे ढोलकीला साथ देणार असून, शाहीर अजित आयरेकर, महेश पाटील आणि शाहीर शामराव खडके हे सूरसाथ करणार आहेत. शिवजयंतीच्या या समारंभास मॉरिशसच्या सांस्कृतिक मंत्री योगिता स्वामिनंदन व महापौर आकाराम सोनू उपस्थित राहणार आहेत.
मदतीचे आवाहन
या कलावंतांचा मॉरिशसमधील खर्च ते शासन करणार आहे; परंतु विमानप्रवास, पासपोर्ट, वेशभूषा, संगीतसाधने, आदींसाठी सुमारे चार लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूरचा शाहीर परदेशात ही कला घेऊन जात असल्याने त्याच्या मदतीसाठी उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी स्वत:हूनच पुढाकार घेतला आहे. त्यांनी राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठान व राजर्षी शाहू फुटबॉल फौंडेशनतर्फे काही रक्कम उत्स्फूर्तपणे दिली आहे. असेच मदतीचे आवाहन व्यक्ती व संस्थांना केले आहे.
कोल्हापूरचे शिवशाहीर राजू राऊत यांचे शाहिरी पथक येत्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारीस) मॉरिशसमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात पोवाडा गाणार आहे. या पथकाची ही एक अदा.