शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 07:59 PM2017-10-05T19:59:50+5:302017-10-05T20:00:02+5:30
मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली.
मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे. गच्चीवरील रेस्टॉरंटला अद्याप पालिकेने मंजुरी दिलेली नाही, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल या इमारतीच्या गच्चीवर दोन हजार चौरस फूट जागेमध्ये चालवण्यात येत होते.
रेड चिल्लीज या कंपनीमार्फत शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खान चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या कंपनीचे गोरेगाव पश्चिम येथी एस व्ही रोडवर प्रशस्त कार्यालय आहे. रेड चिल्लीज एफ एमचे कार्यालयही याच ठिकाणी आहे. येथील कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह नसल्याने हे हॉटेल बांधण्यात आले होते, असे समजते. रेड चिलीज कंपनीच्या कार्यालयातील सुमारे दोन हजार चौरस फूटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करून हे हॉटेल चालवण्यात येत होते. हे सर्व अनधिकृत बांधकाम आज पाडण्यात आले.
ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार- कर्मचारी - अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारीही घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आली, अशी माहिती पी. दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली.