शिक्षणाचे मर्म ओळखणारे ‘शाहू महाराज’ जगाच्या पुढे

By admin | Published: June 27, 2017 12:12 AM2017-06-27T00:12:39+5:302017-06-27T00:23:50+5:30

रघुनाथ माशेलकर : ‘शाहू’ पुरस्कार हा आयुष्यातील सर्वोच्च सन्मान

'Shahu Maharaj' who knows the essence of education is ahead of the world | शिक्षणाचे मर्म ओळखणारे ‘शाहू महाराज’ जगाच्या पुढे

शिक्षणाचे मर्म ओळखणारे ‘शाहू महाराज’ जगाच्या पुढे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षणानेच माणसाचे भवितव्य घडू शकते, हे मर्म ओळखून २१ सप्टेंबर १९१७ ला प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे जगाच्या पुढे होते. त्यांचे हे अलौकिक कार्य साऱ्या जगभर जावे यासाठी २१ सप्टेंबर २०१७ ला या जाहीरनाम्याचा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे केले.
येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘शाहू पुरस्कार’ डॉ. माशेलकर यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. येथील शाहू स्मारक भवनात हा अत्यंत शानदार सोहळा झाला. रोख एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शाहू पुुरस्कार हा आजवरच्या इतिहासातील मला मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार असल्याची भावना सुरुवातीलाच व्यक्त करून डॉ. माशेलकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्यांच्या आयुष्याच्या ५० वर्षांतील
आयुष्यात शाहू महाराजांनी करून ठेवले आहे. त्यांच्यामुळेच देशामध्ये कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
तत्कालीन परिस्थितीचा उल्लेख करून डॉ. माशेलकर म्हणाले, की ब्रिटिशांचा अंमल असतानाही त्यांनी आपल्या विचारांवर कुणाचाही दबाव घेतला नाही. १९४७ साली आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले; परंतु त्याही आधी २१ सप्टेंबर २०१७ रोजी शाहू महाराजांनी आपल्याला शैक्षणिक स्वातंत्र्य दिले. म्हणूनच या हुकुमनाम्याची शताब्दी साजरी करताना आपल्याला सध्याची शैक्षणिक पद्धत बदलणे आवश्यक ठरणार आहे. भविष्यामध्ये अमेरिकेतील ४७ टक्के आणि भारतातील ६७ टक्के रोजगार कमी होतील, अशी भीती असताना भारतातील तरुणांना केवळ शिक्षणाच्याच माध्यमातून रोजगार देता येणार आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, देशविदेशांतील अनेक पदव्या संपादन करून डॉ. माशेलकर यांनी ज्ञानाच्या माध्यमातून किती उत्तुंंग कार्य करता येते याची प्रचिती आणून दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच आता पंतप्रधानांनी डॉ. माशेलकर यांच्यावर ‘स्वच्छ भारत’ची जबाबदारी दिली आहे. हे कामही मोठे आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातूनही भारत पुढे जाईल यात शंका नाही.
महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शाहू महाराजांनी नुसता विकास केला नाही तर त्यांनी पददलित जनतेला सन्मान दिला. काही लोकांची पुरस्काराने उंची वाढते; परंतु येथे माशेलकर यांच्यामुळे पुरस्काराचे मोठेपण वाढले. त्यांनी स्वत:साठी संशोधन न करता जगाच्या पातळीवर देशाला उच्चस्थानी नेण्यासाठी संशोधन केले. राज्यात सध्या कर्जमाफीची चर्चा जोरात आहे; परंतु शाहूराजांनी त्यांच्या राजवटीत शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी जे काही करणे आवश्यक होते ते केले. शेतमालाला भाव मिळावा म्हणून बाजार समित्या स्थापन केल्या गेल्या. मात्र तेथे व्यापाऱ्यांशी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना रास्त भावापासून वंचित ठेवले गेले.
शाहीर आझाद नायकवडी यांच्या शाहूगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले; तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने डॉ. माशेलकर यांचा परिचय करून दिला. त्यांनी करून दिलेल्या परिचयाचे पालकमंत्र्यांनीही कौतुक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मानपत्राचे वाचन केले. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांनी आभार मानले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महापौर हसिना फरास, वैशाली माशेलकर, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. डॉ. माशेलकर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आले असताना कार्यक्रम आटोपशीर करून माशेलकर यांना अधिक वेळ दिल्याबद्दल ट्रस्टच्या संयोजनाचे नागरिकांनी कौतुक केले.
--
अमेरिकेलाही नमविण्याची भारतात ताकद
पोखरणची दुसरी चाचणी झाल्यानंतर दोनच आठवड्यांत भटनागर पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळची आठवण सांगताना ते म्हणाले, या अणुस्फोटानंतर अमेरिकेने आपल्यावर काही बंधने घातली आहेत. आता आपण पुढे काय करायचे असा प्रश्न मला विचारला. जोपर्यंत भारतीय आपल्या बुद्धीवर निर्बंध घालत नाहीत, तोपर्यंत कुणीही आपले नुकसान करू शकत नाही, असं उत्तर मी दिलं. डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं या क्षेत्रात मोठं काम केलं आणि त्याची दखल घेत अखेर अमेरिकेने हे निर्बंध मागे घेतले.
....................
भारताची ताकद वाढल्यानेच पंतप्रधान अमेरिकेत
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे की, जोपर्यंत तुमच्या बाहूंमध्ये ताकद निर्माण होत नाही, तोपर्यंत अमेरिका तुमचा हात हातात घेणार नाही; परंतु आज भारताने ती ताकद कमावली आहे; म्हणूनच पंतप्रधान आज अमेरिकेत ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करीत आहेत, असे डॉ. माशेलकर म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
..........................
शिक्षण म्हणजेच भवितव्य
न्यूटनचा लॉ, आईनस्टाईनच्या लॉपेक्षाही शिक्षण आणि भवितव्य हे सूत्र मला अधिक महत्त्वाचे वाटते, असे सांगून माशेलकर म्हणाले, मी दिव्याखाली अभ्यास केला. अकरावीत १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांमध्ये अकरावा आलो; परंतु परिस्थितीअभावी शिक्षण सोडणार होतो. मात्र सर दोराबजी टाटा ट्रस्टने मला ६० रुपयांची शिष्यवृत्ती सहा वर्षे दिली. ‘रॉयल फेलो’ या पुस्तकामध्ये आईनस्टाईन, न्यूटन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पुस्तकात भारतातील सातजणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सहावी स्वाक्षरी रतन टाटा यांची आहे; तर सातवी माझी आहे. ‘शिक्षण म्हणजेच भविष्य’ या सूत्रामुळेच हे शक्य झाले.
....................
३८ डॉक्टरेट
माशेलकर यांच्या परिचयाच्या सुरुवातीपासूनच त्यांना किती डॉक्टरेट मिळाल्या याबाबत वेगवेगळे आकडे सांगितले जाऊ लागले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना २७ नव्हे, तर ३६ डॉक्टरेट या मानाच्या पदव्या मिळाल्याचे सांगितले. मात्र शाहू छत्रपतींनी त्या ३६ नसून सध्या दोन पदव्या मिळाल्याने त्या ३८ असल्याचे सांगितले. माशेलकर यांनी भाषणामध्ये या पदव्या ३८ असल्याचे सांगितले आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘माशेलकर गाडीत बसेपर्यंतसुद्धा त्यांना एखादी पदवी मिळालेली असेल,’ या दादांच्या वाक्यालाही श्रोत्यांनी दाद दिली.
...............................
महालक्ष्मी आणि अंबाबाई
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना माशेलकर यांना उत्तुंग यश लाभो, अशी प्रार्थना महालक्ष्मी आणि अंबाबाईच्या चरणी करतो, असा उल्लेख केला. सध्या कोल्हापुरात ‘महालक्ष्मी की अंबाबाई’ असा वाद असल्याने मी ही दोन्ही नावे घेतो, असे पाटील म्हणाले.
...............................
कर्जमाफीमागे यशवंतराव थोरात यांचा अभ्यास
कर्जमाफीचा उल्लेख करून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गेल्या आठवड्याभरात खूप काही शिकायला मिळालं. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्यासमवेत अभ्यास करता आला. शेतमालाला भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात झालेल्या कर्जमाफीमागे यशवंतराव थोरात यांचा अभ्यास असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
......................
अखंड प्रेरणा शाहू विचारांची
लोकमान्य टिळक यांनी १ जून १९१६ रोजी ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी घोषणा केली. त्याला गेल्या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. ‘टिळकांचे १०० वर्षांनंतरचे विचार’ यावर आम्ही पुस्तक काढले. महात्मा गांधीजींचे विचार एकविसाव्या शतकातही कसे लागू आहेत यावरही पुस्तक काढले. सर्वच क्षेत्रांमध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या शाहू महाराजांचेही १०० वर्षांनंतरचे महत्त्व विशद करण्यासाठी ‘अखंड प्रेरणा शाहू विचारांची’ असा ग्रंथही प्रसिद्ध करावा, अशी सूचना यावेळी डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली.
.....................
प्रचंड गर्दी, युवकांचीही उपस्थिती
या समारंभालाश्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती. शाहू स्मारक भवनाचे मुख्य सभागृह तर खचाखच भरले होते. बाहेरील मंडपामध्ये आणि पहिल्या मजल्यावरील सभागृहातही श्रोत्यांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच युवक आणि युवतीही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
........................
पुस्तकांमधून कळले शाहू महाराज
शाहू महाराजांविषयी बरेच ऐकले होते. मात्र डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकातून मला शाहू महाराजांचे कार्य विस्तृतपणे समजले. तसेच डॉ. सागर देशपांडे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातूनही मला त्यांच्या अलौकिक कार्याची माहिती मिळाल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

 

Web Title: 'Shahu Maharaj' who knows the essence of education is ahead of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.