शिक्षणाचे मर्म ओळखणारे ‘शाहू महाराज’ जगाच्या पुढे
By admin | Published: June 27, 2017 01:44 AM2017-06-27T01:44:05+5:302017-06-27T01:44:05+5:30
शिक्षणानेच माणसाचे भवितव्य घडू शकते, हे मर्म ओळखून २१ सप्टेंबर १९१७ ला प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षणानेच माणसाचे भवितव्य घडू शकते, हे मर्म ओळखून २१ सप्टेंबर १९१७ ला प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे जगाच्या पुढे होते. त्यांचे हे अलौकिक कार्य साऱ्या जगभर जावे यासाठी
२१ सप्टेंबर २०१७ ला जाहीरनाम्याचा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे केले.
येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘शाहू पुरस्कार’ डॉ. माशेलकर यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते. रोख एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीमती वैशाली माशेलकर यांचा सत्कार महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाला.
शाहू पुरस्कार हा मला मिळालेला सर्वांत मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करून माशेलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जेवढे अभूतपूर्व आहे, तेवढेच महत्त्वाचे कार्य शाहू महाराज यांनी केले आहे. आजच्या काळात
या दोघांच्याही कार्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शाहू हे राजे असले तरी त्यावेळी देशात ब्रिटिशांचे राज्य होते. पारतंत्र्याचे निर्बंध असतानाही त्यांनी स्वत:च्या बुद्धिमत्तेवर कोणतेही निर्बंध न येऊ देता जे कार्य केले ते अलौकिक आहे.
मला शास्त्रज्ञ असे विचारतात की, तुम्हाला न्यूटनचा सिद्धान्त जास्त महत्वाचा वाटतो की आईनस्टाईनचा? परंतु माझ्या मते, ‘इ इज इक्वल टू एफ’ हाच सिद्धान्त महत्त्वाचा व भारताला उपयोगी पडणारा आहे. ‘इ म्हणजे एज्युकेशन’ आणि ‘एफ म्हणजे फ्युचर.’ शिक्षणानेच माणसाचे भवितव्य घडू शकते हा सिद्धान्त आम्ही आता मांडत आहोत, जो शाहू महाराजांनी १९१७ ला मांडला होता.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शाहू महाराजांनी नुसता विकास केला नाही तर त्यांनी पददलित जनतेला सन्मान दिला. काही लोकांची पुरस्काराने उंची वाढते; परंतु येथे माशेलकर यांच्यामुळे पुरस्काराचे मोठेपण वाढले. मेक इन इंडियाचा विचार हा माशेलकर यांचीच देशाला देणगी असल्याचे गौरवोद्गार शाहू छत्रपती यांनी काढले.