अमृत मलमचे संचालक शैलेश जोशी यांची गोळी झाडून घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:29 AM2018-06-04T11:29:06+5:302018-06-04T11:29:06+5:30
मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले.
बेळगाव: देशातील प्रसिद्ध अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली. मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाहणी करता ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून शैलश यकृताच्या व्याधीने त्रस्त होते. यामुळे त्यांना नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:चे जीवन संपवल्याचे कळते. बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. प्रसिध्द अमृत मलम, अमृत फार्मा या कंपन्यांचे ते मालक होते. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला आहे.
माझ्या मृत्यूला मीच जबाबदार : जोशी यांची सुसाईड नोट
स्वतःवर गोळी झाडून घेऊन बेळगावचे उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने बेळगाववासीयांना मोठा धक्का बसला आहे. स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले आहे, माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्यापूर्वी लिहून ठेवले आहे, ही नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यापूर्वी मन घट्ट करून त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती, आपले पत्नी व मुलींवर खूप प्रेम आहे, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.