खेर्डा स्थानकावर ‘शकुंतला’चे इंजिन निसटले!
By admin | Published: May 14, 2017 02:23 AM2017-05-14T02:23:01+5:302017-05-14T02:23:01+5:30
डबे थांबल्याने प्रवासी सुखरूप; नादुरूस्तीचा प्रकार वाढला.
कारंजा लाड : ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी, या मूळ उद्देशाने ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे आजमितीस जुनी जीर्ण झाली असून, तिला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. १३ मे रोजी याचा पुन्हा एकवेळ प्रत्यय आला. खेर्डा (ता. कारंजा) येथील स्थानकावरून पुढे निघलेल्या या रेल्वेचे इंजिन अचानक जोड उखडल्याने डबे सोडून धावायला लागले. यावेळी सुदैवाने डबे जागीच थांबल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही.
पूर्वी यवतमाळ ते मूर्तिजापूर या मार्गावर प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वे रूळ टाकून शकुंतलेची सुरूवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीकडे भारत सरकारचे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत शकुंतला एकप्रकारे वनवास भोगत आहे. या रेल्वेच्या, रेल्वे रूळाच्या आधुनिकीकरणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून ठोस असा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शकुंतलेचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर आहे. १३ मे रोजी सकाळी १0 वाजता ही रेल्वे नित्यनेमाप्रमाणे खेर्डा रेल्वेस्थानकावर पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेल्वेच्या इंजिनच्या डब्यांसोबतचा जोड अचानकपणे निसटला. त्यामुळे काही अंतरापर्यंत फक्त रेल्वेचे इंजिनच धावले. ही बाब खेर्डा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून घडलेला प्रकार रेल्वेचालकाच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणानंतर रेल्वेचे डबे थांबल्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर सदर इंजिन पुन्हा डब्यांना जोडून शंकुतला रेल्वे पुढील मार्गक्रमणाकरिता सज्ज झाली. तथापि, अशा गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.