Shalini Thackeray: “हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 13:54 IST2022-05-15T10:57:48+5:302022-05-15T13:54:34+5:30
Shalini Thackeray: ''भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.''

Shalini Thackeray: “हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेत वादाची ठिणगी उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका केली जातीये. यातच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आपल्या सभेत राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्या टीकेला आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
''हल्ली एक मुन्नाभाई भगवी शाल पांघरुन फिरतोय, त्याला आपणच बाळासाहेब आहोत, असं वाटू लागलंय'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शालिनी यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा जोडलेला एक फोटो ट्विट केलाय. या फोटोसोबत लिहीले की, "कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो....फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही...!!!'', अशी टीका शालिनी यांनी केली आहे.
कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.... फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही...!!!#RajThackeraypic.twitter.com/gVlfgByl4k
— Shalini Thackeray (@ThakareShalini) May 15, 2022
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
काल मुंबईत शिवसेनेची भव्य सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर जोरदार हल्लाबेल केला होता. "काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं."
"तसंच सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. त्याला आपण आपणच बाळासाहेब आहोत, असं वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे, तसंच यांचंही झालंय, त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील, कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही," अशी शेलक्या शब्दात टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.