रावसाहेब दानवे म्हणतात, "आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:37 PM2024-09-03T17:37:52+5:302024-09-03T17:39:16+5:30
Raosaheb Danve Maharashtra Politics : सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांना 2024 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Raosaheb Danve Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला जबर फटका बसला. भाजपच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. यात जालना लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. सलग पाच वेळा भाजपकडून खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यावेळी पराभूत झाले. या पराभवाबद्दल दानवे विचारण्यात आले, तेव्हा त्यांना कारण सांगितले.
माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, "माझा पराभव कोणत्याही एका व्यक्तीमुळे झाला नाही. माझा पराभव जनमतामुळे जाला. त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्याच्या राजकारणात अचानक बदल झाला आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसला."
संतोष दानवेंच्या मतदारसंघात काळेंना मताधिक्य
लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना त्यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघातही मताधिक्य मिळाले नाही. याचाही त्यांनी उल्लेख केला.
"माझ्या मुलाच्या मतदारसंघातही मला लीड मिळाला नाही. मग त्यात माझ्या मुलाने काम केले नाही, असे मी म्हणू का? किंवा मी आता त्याचाही बदला घेऊ का?", असे विधान दानवे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीची दानवेंवर मोठी जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत मोठे अपयश आल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी काम सुरू केले आहे. भाजपकडून 288 मतदारसंघांमध्ये रणनीतीनुसार काम सुरू असून, आता रावसाहेब दानवे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रावसाहेब दानवे यांची विधानसभा राज्य निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एका चेहऱ्यावर नव्हे, तर सामूहिक नेतृत्व समोर करणार आहे.