शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 08:29 AM2024-09-21T08:29:26+5:302024-09-21T08:30:02+5:30
मध्यरात्री शंभूराज देसाई यांची फोनवरून मनोज जरांगे यांना विनंती, मध्यरात्री लावली सलाईन
पवन पवार
वडीगोद्री - अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती.
शुक्रवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना समर्थक आंदोलकांकडून आग्रह केल्यानंतर व मध्यरात्री शंभूराज देसाई यांची फोनवरून मनोज जरांगे यांना सलाईन विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार दिला आणि शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता त्यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांना मध्यरात्री सलाईन लावल्यानंतर सकाळपर्यंत त्यांना चार सलाईन लावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वाद
उपोषणाच्या ५ व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली होती. त्यानंतर रात्री उशिरा वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली. जालनातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे त्याठिकाणापासून ३ किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवालीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्याने इथं मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात.