मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:01 PM2024-07-02T16:01:09+5:302024-07-02T16:02:05+5:30
Shambhuraj Desai : मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
मुंबई : अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल करत मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असून याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल आणि मनोज जरांगे यांना योग्य सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
मंगळवारी विधानसभेत शंभुराज देसाई यांनी सांगितले की, यासंदर्भात जालना पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवला जाईल. तसेच, ड्रोनद्वारे कोण टेहळणी करीत आहे, याची चौकशी केली जाईल. मनोज जरांगे पाटील यांना यापूर्वीच सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय, आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल, असेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे वृत्त आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का? मनोज जरांगेंचा सवाल
दरम्यान, मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर ठाम आहेत. आज पत्रकारांशी बोलताना मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले, ६ जुलै ते १३ जुलै शांतता रॅलीत सर्वांनी एकत्र यावे. आता हीच वेळ आहे. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. ते अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, असे वाटत आहे. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.