बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:39 PM2018-10-04T16:39:56+5:302018-10-04T16:43:12+5:30
परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. एकीकडे मुलींवर अत्याचार वाढत असल्याचे चित्र असताना विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली. राज्यभरात याबाबत संताप निर्माण झालेला असताना यवतमाळात आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या पेपर सहामध्ये ‘महानगरीय जाणीवेचे साहित्य’ हा घटक अंतर्भूत आहे. या घटकात कवी दिनकर मनवर यांचा ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा कवितासंग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु, या संग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी समाजाच्या तरुणींबाबत अश्लील उल्लेख असल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. ‘काळं असावं पाणी कदाचित, पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं, किंवा आदिवासी पोरीच्या ...सारखं जांभळं’ या ओळींमध्ये आदिवासी महिला, मुलींविषयी लज्जास्पद उल्लेख आला. सकल आदिवासी समाजाचा अपमान करणारी ही ओळ असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप नोंदविला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील तसेच दूरशिक्षण विभागातील पदवीच्या विद्यार्थ्यांना ही कविता अभ्यासण्यासाठी देण्यात आली आहे. त्यातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आदिवासी तरुणींना भयंकर मानसिक त्रास भोगावा लागू शकतो.
त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी, अभ्यासक्रम निवड मंडळाने ही कविता कोणत्या निकषावर अभ्यासक्रमात घेतली याचा तपास केला जावा, अशी मागणी बिरसा क्रांती दल आणि गोंडवाणा गणतंत्र पार्टीने केली आहे. कवी दिनकर मनवर, अभ्यासक्रम निवड समिती व कवितासंग्रह छापणाऱ्या पॉप्युलर प्रकाशन यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कविता वगळली, गुन्हे नोंदवा
राज्यभरातून आदिवासी संघटनांनी आवाज उठविताच मुंबई विद्यापीठ सावध झाले. मराठी अभ्यास मंडळाचा तातडीने ठराव घेऊन संबंधित आक्षेपार्ह कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. या कवितेवर परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, ही कविता कोणत्याही महाविद्यालयात शिकवू नये, असा आदेश विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव सुनिल भिरुड यांनी काढले. मात्र, संबंधित कवी, निवड समिती आणि प्रकाशकावर गुन्हे दाखल न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांतीदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी दिला आहे.
सोशल मिडियावरही सुंदोपसुंद
या कवितेवरून सोशल मिडियावर बरेच वादप्रतिवाद दररोज झडत आहेत. जुन्या प्रतिष्ठित कवींच्या कवितांचे दाखले दिले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र् याची परिमाणे तपासली जात आहेत. या सर्व चर्चेला कुठे विराम मिळतो तेच आता पाहणे बाकी आहे.