शनिचौथऱ्याचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
By Admin | Published: February 7, 2016 01:07 AM2016-02-07T01:07:23+5:302016-02-07T01:07:23+5:30
शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य राहील, अशी भूमिका शनिशिंगणापूर देवस्थान
अहमदनगर : शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य राहील, अशी भूमिका शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि पुण्याच्या भूमाता ब्रिगेडने घेतली़ तर महिलांना चौथऱ्यावर प्रवेश न देण्याच्या भूमिकेवर शनैश्वर देवस्थान बचाव कृती समिती आणि ग्रामपंचायत ठाम राहिली़
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी तोडगा काढण्यासाठी शनिवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात संयुक्त बैठक झाली़ या बैठकीस नेवासेचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड़ रंजना गवांदे, शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा अनिता शेटे, शनैश्वर देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व अन्य उपस्थित होते़ या बैठकीदरम्यान पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता़
तत्पूर्वी तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना महिलांना शनिचौथऱ्यावर प्रवेश न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ मात्र, बैठकीनंतर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले़ तर देवस्थान ट्रस्टनेही मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य राहील, असे बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले़ पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू झालेली ही बैठक सुमारे दोन तास चालली़ (प्रतिनिधी)
स्त्री-पुरुष समानता आणि उपासनेचा समान हक्क देवस्थानकडून पायदळी तुडविला जात आहे़ यापूर्वी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात होता़ त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे़ मग आताच देवस्थानने महिलांना प्रवेश बंद का केला? - तृप्ती देसाई
शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळण्यासंबंधी २००१ साली उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे़ महिलांना शनिचौथऱ्यावर प्रवेश मिळावा, अशी आमची मागणी कायम आहे़
- अॅड़ रंजना गवांदे,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
शिंगणापूर देवस्थानची ४०० वर्षांची परंपरा मोडू दिली जाणार नाही़ इतर अनेक देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही़ तेथे का आंदोलन केले जात नाही? महिलांना शनिचौथऱ्यावर जाऊ देणार नाही़
- संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शनैश्वर देवस्थान बचाव कृती समिती