शनिशिंगणापूरला २ महिला विश्वस्त

By admin | Published: January 7, 2016 02:47 AM2016-01-07T02:47:22+5:302016-01-07T02:47:22+5:30

शनीच्या चौथऱ्यावर महिलांना पाऊलही ठेवण्याची परवानगी नसलेल्या शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदी दोन महिलांची निवड होण्याची ऐतिहासिक घटना बुधवारी घडली.

Shanishingnapur 2 Female Trustees | शनिशिंगणापूरला २ महिला विश्वस्त

शनिशिंगणापूरला २ महिला विश्वस्त

Next

सोनई (जि. अहमदनगर) : शनीच्या चौथऱ्यावर महिलांना पाऊलही ठेवण्याची परवानगी नसलेल्या शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदी दोन महिलांची निवड होण्याची ऐतिहासिक घटना बुधवारी घडली. अहमदनगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अनिता चंद्रहास शेटे आणि शालिनी राजू लांडे यांच्यासह ११ विश्वस्तांची यादी जाहीर केली असून, ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन महिला शनी देवस्थानच्या विश्वस्त बनल्या आहेत.
गेल्या महिन्यात पुण्यातील एका तरुणीने चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले होते. त्यावरून राज्यभरात चर्चा आणि वाद झाला होता. त्यानंतर महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळण्यासाठी काही महिला कार्यकर्त्यांनी शनिशिंगणापूरमध्ये आंदोलनही केले होते. त्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या विश्वस्तपदी दोन महिलांची निवड होणे, ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे. दोन माजी विश्वस्त वगळता ९ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. एकूण ९८ जणांनी अर्ज केले होते, त्यात १० महिलांचा समावेश होता. बापूसाहेब शंकर शेटे, डॉ. रावसाहेब बानकर, नानासाहेब विठ्ठल बानकर, योगेश कचरू बानकर, डॉ. वैभव सुखदेव शेटे, आदिनाथ जगन्नाथ शेटे, दीपक दादासाहेब दरंदले, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे आणि भागवत सोपान बानकर यांचा विश्वस्तांमध्ये समावेश आहे.
शासनाने महिलांना विश्वस्त होण्याची दिलेली संधी ऐतिहासिक निर्णय आहे, त्याचा आनंद वाटतो. भविष्यात चांगले काम करून देवस्थानचा लौकिक वाढवू.
- अनिता शेटे, नवनियुक्त विश्वस्त
शासनाने देवस्थानची जबाबदारी पाहण्याची संधी देऊन नारीशक्तीचा गौरव केला आहे. देवस्थानचा कारभार अधिकाधिक पारदर्शक आणि नि:पक्षपणे होईल, यासाठी निष्ठेने काम करू.
- शालिनी लांडे, नवनियुक्त विश्वस्त
दहा वर्षांत चुकीची कामे करणाऱ्यांकडे पुन्हा देवस्थानचा कारभार सोपविला आहे. या अन्यायकारक निवडीविरोधात नाशिकच्या सहआयुक्तांकडे अपील करून निवडीला आव्हान देणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करणार आहेत.
- आ. बाळासाहेब मुरकुटे, नेवासा

Web Title: Shanishingnapur 2 Female Trustees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.