शंकरमहाराज आणि विश्वस्तांच्या अटकेसाठी न्यायालयात धाव

By admin | Published: September 16, 2016 12:58 AM2016-09-16T00:58:35+5:302016-09-16T00:58:35+5:30

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा जो प्रयत्न झाला, त्यासाठी ‘अनुभव ब्रह्म’ पुस्तकाचे लेखक शंकर महाराज, प्रकाशन समिती आणि आश्रमाचे सर्व ट्रस्टी

Shankar Maharaaj and the trustees of the court for the arrest | शंकरमहाराज आणि विश्वस्तांच्या अटकेसाठी न्यायालयात धाव

शंकरमहाराज आणि विश्वस्तांच्या अटकेसाठी न्यायालयात धाव

Next

अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा जो प्रयत्न झाला, त्यासाठी ‘अनुभव ब्रह्म’ पुस्तकाचे लेखक शंकर महाराज, प्रकाशन समिती आणि आश्रमाचे सर्व ट्रस्टी जबाबदार असल्याचे निवेदन करून सर्वांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याचे आदेश तपास संस्थेला द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज वकील संजय वानखडे यांनी न्यायालयात दाखल केला.
धामणगावचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.आर.इंदरकर यांच्या न्यायालयात कलम १५६ (३) अंतर्गत बुधवारी दाखल झालेल्या या अर्जावर काय निर्णय दिला जातो, याकडे जिल्हाभरातील हजारो नजरा खिळल्या आहेत. शंकरमहाराज, कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी आणि ट्रस्टींच्या अटकेसाठी जिल्हाभरात अनेक मोर्चे निघालेत आणि शासनाला निवेदनेही देण्यात आलीत, हे येथे उल्लेखनीय.
अर्जदार वकील संजय वानखडे हे अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात. २ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची भेट घेऊन त्यांनी तक्रार दाखल केली होती. ४ सप्टेंबर रोजी त्यांनी धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात स्वत: जाऊन तक्रार दाखल केली होती. शंकरमहाराज, प्रकाशन समितीतील व्यक्ती आणि सर्व ट्रस्टींविरुद्ध ‘‘नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१)(२)’’ व भारतीय दंड संविधानचे कलम २९५ (अ) नुसार गुन्हे नोंदविण्याची, अटक करण्याची मागणी या तक्रारीतून केली होती.
मंगरूळचे ठाणेदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या तक्रारीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे या दोघांना गैरअर्जदार करून उल्लेखित कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारा अर्ज वानखडे यांनी न्यायालयात दाखल केला आहे.
१४ पानांच्या या अर्जात अनेक गंभीर मुद्यांचा ऊहापोह वानखडे यांनी केला आहे. जिल्ह्यात शंकरमहाराज यांची ओळख मंत्रतंत्र, अष्टसिद्धी प्राप्त असलेले चमत्कारिक महाराज अशी आहे. झोपडीत आत्मसाक्षात्कार झाल्याचे शंकरमहाराजांचे म्हणणे आहे. तथापि महाराजांच्या अख्त्यारित कोट्यवधी रुपयांची संपत्ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. शंकरमहाराज गुप्तधन शोधणे, दरबार भरविणे, अशी कामे करतात.
शंकरमहाराजांनी स्वानुभूतीतून लिहिलेल्या ग्रंथात,‘तुम्ही ज्या-ज्या व्यक्तीच्या भूमध्यभागी पाहाल ती व्यक्ती तुम्हाला तत्काळ पूर्णपणे अनुकूल होऊन, तुम्ही तिला जी आज्ञा कराल ती व्यक्ती मोठ्या आनंदाने पार पाडील’ असे लिहिले आहे. यानुसारच दोन विद्यार्थ्यांवर नरबळीसाठी हल्ला करण्यात आला, असे निवेदन वानखडे यांनी अर्जातून केले आहे. जमिनीतील गुप्तधन तसेच दैवशाली आणि पायाळू माणसाचे महत्त्व पुस्तकात लिहिले आहे. शंकरमहाराज भक्तांना गुप्तधन प्राप्त करण्याची विद्या शिकवीत होते, असेही निवेदन अर्जातून करण्यात आले आहे.
सदर पुस्तक कायद्याचा भंग करणारे आहे, असेही अर्जदाराने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आहे. आश्रमाच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर मुद्यावर २४ सप्टेंबर रोजी न्यायालय निर्णय जाहीर करेल. (प्रतिनिधी)

Web Title: Shankar Maharaaj and the trustees of the court for the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.