शंकरराव तोरस्कर यांची १०७ वे हुतात्मा म्हणून नोंद

By Admin | Published: January 22, 2016 01:00 AM2016-01-22T01:00:19+5:302016-01-22T01:04:10+5:30

५९ वर्षांनंतर शासनाकडून दखल : नातू संजय तोरस्कर यांच्या प्रयत्नांना यश; महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीतील पश्चिम महाराष्ट्रातील पहिले हुतात्मा

Shankarrao Toraskar as 107th Martyr | शंकरराव तोरस्कर यांची १०७ वे हुतात्मा म्हणून नोंद

शंकरराव तोरस्कर यांची १०७ वे हुतात्मा म्हणून नोंद

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने सन २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीतील हुतात्म्यांची यादी जाहीर केली होती. त्यात या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बलिदान देणारे कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर यांचे नाव यादीत नव्हते. त्यांच्या नातेवाइकांनी याबाबत लढा देत राज्य शासनाच्या विविध खात्यांकडे अर्ज-विनंत्या व पुरावे सादर केले. त्यांच्या कष्टाला अखेर यश आले. १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाने १०७ वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद केल्याची माहिती नातू संजय तोरस्कर यांनी दिली. कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीत अग्रभागी होते. १८ जानेवारी १९५६ रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगीनीने जखमी झाले. त्यातच त्यांचा सात दिवसांत मृत्यू झाला. तशी ही घटना ५० वर्षांहून अधिक काळाची होती. तिचे पुरावे मिळविणे तसे कुटुंबीयांना अवघड काम होते. तरीही त्यांच्यासमवेत त्यावेळी असणारे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे, पैलवान नारायण जाधव यांनी स्वत: येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जबाब नोंदविले.
त्याचबरोबर महानगरपालिका, सीपीआर, जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालय, पुराभिलेखागार, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई मंत्रालय येथे पाठपुरावा केला. तीन वर्षांच्या अखंड पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने १०७ वे हुतात्मा म्हणून असाधारण राजपत्रात त्यांची नोंद घेतली. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाकडून १३ जानेवारीला तोरस्कर कुटुंबीयांना प्राप्त झाले.
यावेळी अ‍ॅड. शाहू काटकर, आप्पासाहेब जाधव, रमेश पोवार, स्वाती तोरस्कर, आदी उपस्थित होते.


गोळी लागूनही थांबले नाहीत शंकरराव !
सन १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्रातून मुंबई गुजरातला जोडण्याचा घाट काही नेतेमंडळींनी घातला होता. त्याच्या निषेर्धात १७ जानेवारी १९५६ मध्ये बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे. मुंबई महाराष्ट्रातून तोडू नये, याकरीता मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. त्यात अनेक आंदोलकांना आपला जीव गमावावा लागला. त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौक येथे १८ जानेवारी १९५६ रोजी भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील तालीम, मंडळे येथील कार्यकर्त्यांची निषेध सभा झाली. या सभेसाठी जुना बुधवार पेठ तालीम येथील तरुणही सहभागी झाले होते. त्यात शंकरराव तोरस्कर हा २१ वर्षाचा अविवाहित तरुणही सहभागी झाला होता. त्यावेळी सरकारने निषेध सभा, एकत्रित जमण्यास मज्जाव करत संचारबंदी जाहीर केली होती. सभा सुरू झाली आणि पोलिसांचा प्रथम लाठीमार व नंतर गोळीबार झाला. पोलिसांनी जमाव नियंत्रणात येत नाही, असे दिसताच गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात अनेकजण सैरावैरा धावू लागले. मात्र, शंकरराव तोरस्कर हे व्यासपीठाकडे धावले. यावेळी त्यांना डाव्या खांद्यात गोळी लागली. गोळी लागूनही हा तरुण थांबत नाही म्हटल्यावर एका पोलिसाने त्यांच्या पोटात संगीन घुसवली. त्यात जखमी होऊन ते खाली पडले. जखमी शंकररावांना नारायण जाधव, प्रा. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे आदींनी त्यावेळच्या थोरल्या दवाखान्यात (सीपीआर)मध्ये दाखल केले. १८ ते २४ जानेवारीअखेर त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. अखेर २५ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या नावाने गेली कित्येक वर्षे बुधवार पेठेतील चौकाला ‘हुतात्मा तोरस्कर चौक’ म्हणून ओळखले जाते



हौतात्म्य जाहीर करून शासनाने त्यांच्या लढ्याला एकप्रकारे न्याय दिला. आमच्या काकांना मरणोत्तर न्याय मिळावा व त्यांना हुतात्मा म्हणून गौरविण्यात यावे, याकरिता आम्ही तोरस्कर कुटुंबीय गेले चार वर्षांपासून फेऱ्या मारत होतो. शासनाने मागितले तितके पुरावे दिले. त्यात सन २०१२ मंत्रालय जळाले. त्यात आमची फाईलही जळाली. आम्ही मात्र न खचता पुन्हा सर्व पुरावे दिले.
- संजय तोरस्कर, हुतात्मा तोरस्कर यांचे पुतणे

Web Title: Shankarrao Toraskar as 107th Martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.