शस्त्राने नाही तर ‘शास्त्राने’ शांती-लोणारकरबाबा
By admin | Published: September 5, 2016 12:41 AM2016-09-05T00:41:05+5:302016-09-05T00:41:05+5:30
बुलडाणा येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा.
बुलडाणा, दि. ४ : आज सगळ्या जगात अशांतता आहे. दहशतवाद, हिंसाचाराने संपूर्ण जग पोळून निघाले आहे. सर्वांंना शांतीची गरज वाटत आहे. शांतीसाठी काही लोक शस्त्रांचा वापर करीत आहे. परंतु शस्त्राने कधीच शांती निर्माण होऊ शकत नाही, त्यासाठी शास्त्राचीच गरज आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेतुन आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सूत्रपाठरुपी शास्त्राच्या द्वारे जगाला शांतीचा आणि करुणेचा संदेश दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास जगात शांतता नांदल्या शिवाय राहणार नाही असे विचार महानुभाव पंथांचे आचार्य प.प.पु.महंत लोणारकरबाबा यांनी रविवारी बुलडाणा येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने सलग २४ व्या वर्षी महानुभाव आश्रम येथे राज्यस्तरीय सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना लोणारकरबाबा बोलत होते. याप्रसंगी मंचावर आचार्य मेहकरकरबाबा. महंत कल्याणकरबाबा, महंत आवेराजबाबा, महंत संवत्सकरबाबा, महंत पेनुरकरबाबा, महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माळी, शेंदुर्णी येथील महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे संचालक गोविंदसेठ अग्रवाल, ई. संतोषमुनी बिडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना लोणाकरबाबा यांनी दहशतवाद हा अज्ञानाने निर्माण होतो. ज्ञानासाठी गीतेसारख्या शास्त्राचा उपयोग केला पाहिजे, असे सांगितले. बाराव्या शतकात सामाजीक असहिष्णुता निर्माण झाली होती, महिला आणि शुद्रांना समान अधिकार नव्हते. त्यावेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरांनी शांतीच्या मार्गाने समाजात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम महिलांना धर्माचे आणि शिक्षणाचे द्वार उघडे करुन दिले. स्वामींच्या विचारांचे अनुकरण केल्यास जागतिक शांतता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही,असे मत लोणारकरबाबांनी व्यक्त केले.
इतर मान्यवरांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गीता ज्ञान परिक्षेचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आनंदमुनी भोजने व बाईदेवबास लोणाकर लिखित ह्यप्रसाद सेवाह्ण आणि ह्यदृष्ठांत पाठह्ण या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. संदेश राठोड व डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक परिषदेचे उपाध्यक्ष उद्धव वाळेकर यांनी केले.
संचालन महेंद्रदादा बिडकर व धनंजयदादा लोणारकर यांनी तर आभार गोपालदादा पंजाबी यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातुन तसेच जिल्ह्यातील काणाकोपर्यातून आलेले महानुभाव अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्वामींचा अवतार दिन मराठी दिन व्हावा : आवलगावकर
मराठी भाषेला देववानी बनविण्याचा सर्वात पहिला प्रयत्न श्रीचक्रधर स्वामींनी केला, स्वामींच्या शिष्य परिवाराने जाणीवपूर्वक मराठी भाषेत ग्रंथ निर्मिती केली. मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्या स्वामींचा अवतार दिन खर्या अर्थाने मराठी भाषा दिन म्हणुन साजरा झाला पाहिजे असे मत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. स्वामींच्या लिळांचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. स्वामींच्या विचारांचे चिंतन केले पाहिजे असे आवाहन देखील आवलगावकर यांनी केले.
समाजाला शाहनपण देणारा हा उत्सव : सपकाळ
आज आपण आकाशी झेप घेतली आहे, परंतु आपले पाय जमिनीवर स्थिर आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज प्रचंड स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेच्या या युगात कुठे थांबवं याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. अशांतता,असंतुष्टी यामुळे मनुष्य जीवन विचलीत झाले आहे. अशावेळी आपण शाहणे झालो आहे का याचे चिंतन होणे गरजेचे आहे. समाजाला शाहनपण देणारा आजचा हा उत्सव आहे असे मत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.