किशोर मारणे खुनप्रकरणी शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप

By Admin | Published: May 19, 2016 04:24 PM2016-05-19T16:24:50+5:302016-05-19T16:24:50+5:30

टोळीयुद्धातून किशोर मारणे याचा खुन केल्याप्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Sharad Mohol murder case: Seven persons have been given life imprisonment | किशोर मारणे खुनप्रकरणी शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप

किशोर मारणे खुनप्रकरणी शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 19 -  टोळीयुद्धातून किशोर मारणे याचा खुन केल्याप्रकरणी सराईत गुंड आणि जर्मन बेकरीतील आरोपी कातिल सिद्दिकी याचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये खुन करणा-या शरद मोहोळ याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यासह सात जणांना जन्मठेप व प्रत्येकी ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़. या प्रकरणातील चार जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
 
शरद हिरामण मोहोळ, अमित अनिल फाटक, दीपक गुलाब भातंमब्रेकर, दत्ता किसन गोळे, योगेश भाऊ गुरव, हेमंत पांडुरंग धाबेकर, मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. रोहन चंद्रकांत धर्माधिकारी, शाम ऊर्फ संदीप विश्वनाथ नाटेकर, नवनाथ नारायण फाले आणि अजय तुकाराम कडू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
 
मारणे आणि मोहोळ टोळीयुद्धातील खुन प्रकरणाचा निकाल दिला जाणार असल्याने आज सकाळपासूनच शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मुख्य इमारतीत लोकांना सोडताना त्यांची झडती घेऊन सोडले जात होते़ 
कोथरूड येथील गुंड गणेश मारणे टोळीची आर्थिक सूत्रे सांभाळणा-या गुंड किशोर मारणे याचा टोळीयुद्धातून गोळ्या घालून व कोयत्याने वार करून ११ जानेवारी २०१० मध्ये निलायम चित्रपटगृहाशेजारील हॉटेल प्लॅटिनममध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
काय आहे प्रकरण - 
टोळी युध्दातून सँडी उर्फ संदीप मोहोळ याचा खून गणेश मारणे याने केल्याप्रकरणी त्याला अटक होऊन त्याची रवानगी कारागृहात झाली होती. त्यावेळी गणेश मारणेच्या टोळीची सुत्रे किशोर मारणे याच्याकडे आली होती. त्यामुळे याचा काटा काढण्यासाठी कुख्यात शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी नियोजनबध्द सापळा रचला. घटनेच्या दिवशी किशोर मारणे निलायम चित्रपटगृहात नटरंग सिनेमा पाहण्यासाठी आला होता. सिनेमा संपल्यानंतर किशोर मारणे जवळच असलेल्या प्लॅटिनम हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. चहा पिण्यासाठी बसल्यानंतर त्याच्या खूनासाठी दबा धरून बसलेल्या शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी किशोर मारणे याच्यावर गोळीबार करून तसेच कोयत्याने तब्बल ४० वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यावेळी शरद मोहोळ आणि अमित पाठक ना. सी. फडके चौकाकडे पळत जात असताना त्यांना एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने अडवले. त्यावेळी अमित पाठक याच्या अंगावर रक्ताने माखलेला शर्ट होता. आपल्या अधिकाºयांना फोन करीत असताना दमदाटी करून त्याने त्यांचा मोबाईल फोडून दोघेही पसार झाले. या प्रकरणी शरद मोहोळसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. खटल्यात ३३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले़
 
जन्मठेपेसह विविध कलमाखाली शिक्षा -
आरोपींवर गुन्हेगारी कट रचल्याबद्दल १२० ब खाली जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा़ खुन केल्याबद्दल जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा़ बेकायदेशीर मंडळी जमवून गुन्हेगारी कृत्य केल्याबद्दल कलम १४३ खाली ३ महिने शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिने शिक्षा़ कलम १४८ खाली ६ महिने शिक्षा व ५०० रुपये दंड, १ महिने शिक्षा
मुर्तझा ऊर्फ मुन्ना शेख याला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी १ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना शिक्षा अशा शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत़ 
 
आम्हाला फाशी द्या -
न्यायाधीश भिलारे यांनी आरोपींना तुम्ही दोषी आहात, असे सांगून शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का अशी विचारणा केली तेव्हा सर्वांनी आम्ही निर्दोष आहोत, आमच्यावर अन्याय झाला आहे़ ही शिक्षा आम्हाला मान्य नाही, असे सांगितले. हेमंत धाबेकर याने आम्ही दोषी असेल तर फाशी द्या असे सांगितले. आरोपींचे वकिल नंदू फडके यांनी आपण आरोपींशी थेट विचारणा केल्याने आता आणखी काही सांगायचे नसल्याचे सांगितले़ सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Sharad Mohol murder case: Seven persons have been given life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.