शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:14 AM2020-02-22T11:14:07+5:302020-02-22T11:23:00+5:30
शेतीऐवजी या हातांना अन्य क्षेत्रांमध्ये कसं काम करता येईल, त्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल.
मुंबईः शेतीवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे. 51 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. दोन हेक्टरच्याहून कमी शेतीवर कुटुंबातील पाच माणसं अवलंबून आहेत. एवढ्या लोकांना जगवण्याची शेतीमध्ये ताकद आहे. शेतीऐवजी या हातांना अन्य क्षेत्रांमध्ये कसं काम करता येईल, त्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल, असं शरद पवार म्हणाले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
कुटुंबातील एकानंच शेती करावी. शेतीवर अवलंबून कुटुंब चालवणं आता कमी व्हायला हवं. शेतीवरचं ओझं कमी करण्याची गरज आहे. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग हा शेतीवर अवलंबून आहे. जवळपास 58 ते 60 टक्के लोक या देशात शेती करतात. शेतीच्या समस्या खूप आहेत. सर्वात मोठी शेतीची समस्या पाणी आहे. भारतात 44 ते 45 टक्के शेती ही खात्रीशीर पाण्यावर केली जाते. सर्वात जास्त पाण्याचे साठे आणि धरणं ही महाराष्ट्रात आहेत. पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ ही पिकं उत्तमरीत्या घेतली जातात. उत्तर प्रदेश आणि हरियाणातही तीच गोष्ट आहे. दक्षिणेकडेही भाताची दोन ते तीन पिकं घेतली जातात, ती स्थिती आपली नाही.
अन्नधान्य ही देशाची गरज आहे. त्याबद्दल काहीच वाद नाही. अन्न-धान्य उत्पन्नासाठी महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब की उत्तर प्रदेश कोणती राज्यं योग्य आहेत, याचा विचार व्हावा. उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. ठिबक सिंचनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला लागतो. महाराष्ट्रात उसाचं उत्पादन त्यापासून साखरेचं उत्पादन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. उसापासून ज्युस आणि अन्य पदार्थही तयार करता येतात. साखर उत्पादनात राज्य दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात कापसावर आधारित उत्पादनांमध्ये वाढ झालेली आहे, असं म्हणत शरद पवारांनी शेतीसंदर्भात आपला दृष्टिकोन मांडला आहे.