शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:52 PM2024-10-04T23:52:16+5:302024-10-04T23:53:07+5:30

Maratha Reservation: शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवून ८० टक्क्यांपर्यंत करावी, त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं विधान केलं होतं. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Sharad Pawar advised to increase the reservation limit, Manoj Jarange Patil said, first the Marathas... | शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...

शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...

मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ५० टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर जारांगे पाटील यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवून ८० टक्क्यांपर्यंत करावी, त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं विधान केलं होतं. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करा, मग तुम्हाला काय हवं ते करा, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. 

शरद पवार यांनी दिलेल्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अगोदर तुम्ही आमचा ५० टक्क्यांच्या आतील २७ टक्के ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करा. मग तुम्ही ७५ टक्के काय दीडशे टक्के वाढवा, आम्हाला काही देणंघेणं नाही. पण अगोदर मराठ्यांचा ५० टक्के आरक्षणातील २७ टक्के आरक्षणामध्ये ओबीसींमधून समावेश करा. नंतर तुम्हाला काय करायचंय ते करा. 

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, या अशा गोष्टी निवडणुकीच्या काळातच तुम्हाला का सूचतात. १३ महिन्यांपासून आम्ही आरक्षणाबाबत बोलतोय. समाज त्रस्त झालेला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काहीतरी बोलून दाखवायचं आहे. मर्यादा वाढवा, अमकं करा, तमकं करा, ही पुन्हा मराठ्यांची फसवणूकच आहे. 

Web Title: Sharad Pawar advised to increase the reservation limit, Manoj Jarange Patil said, first the Marathas...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.