बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:13 PM2023-04-26T15:13:56+5:302023-04-26T15:24:39+5:30

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली.

Sharad Pawar advises the state government to discuss the Barsu refinery project dispute with the locals | बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच"

बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच"

googlenewsNext

मुंबई - एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. बारसू रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. 

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यात पवार म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माझी भेट घेतली आणि बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. सामंत यांनी बारसू येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांची उद्या गुरुवारी (२७ एप्रिल) बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी उदय सामंत यांनी दाखवल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

बैठकीत मार्ग निघाल्यास आनंद
उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल. एखादा प्रकल्प करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घ्या. त्यांचा विरोध आहे तर तो का आहे हे समजून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात चालले आहेत. सरकार काही करत नाही ही भूमिका आम्ही लोक मांडतो. त्यामुळे कोकणातसुद्धा उद्योग वाढावेत अशा प्रकारचे मत मांडणारा एक वर्ग आहे. त्यांच्याकडून कोकणाकडे दुर्लक्ष होतेय अशी सरकारकडे तक्रार होती. अशावेळी काही प्रकल्प आले आणि त्यावेळी प्रकल्पासंदर्भात विरोध असेल तर तो समजून घेणे, त्यांचा गैरसमज दूर करणे, किंवा जर होत नसेल आणि तिथल्या एकंदरीतच स्थितीला नुकसान करत असेल तर अन्य जागा निवडावी या पर्यायांची चर्चा करावी लागते आणि ती केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

खारघर दुर्घटनेप्रकरणी न्यायाधीशांची समिती हवी
खारघर प्रकरणी एक सदस्य समितीचा उपयोग होणार नाही. एक सदस्य हा सरकारचा अधिकारी आहे. त्याने निर्णय घेतले तर त्यात राज्याच्या प्रमुखापासून अन्य सहकारी आहेत. त्यात राज्याच्या प्रमुखांचाही सहभाग आहे. अशी तक्रार असेल तर त्याची चौकशी एक अधिकारी  करु शकत नाही. म्हणून या प्रकरणाची चौकशी करायला न्यायाधीशांची समिती स्थापन करून पावले टाकावीत अशी मागणी आम्ही अगोदरच केली आहे असंही शरद पवार यांनी पत्रकांराना सांगितले. 

Web Title: Sharad Pawar advises the state government to discuss the Barsu refinery project dispute with the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.