शरद पवारही चुकलेले, मग काय गोळ्या घालता का? सदाभाऊ खोतांचे 'सैतान'वर स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:22 PM2023-07-11T16:22:42+5:302023-07-11T16:22:59+5:30
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असे म्हटले होते.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यावर सदाभाऊंना काळे फासणार, राज्यात फिरू देणार नाही असा विरोध सुरु झाला होता. अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना कुवत दाखवली तर आमदार रोहित पवार यांनी मर्यादेत राहण्याचा इशारा दिला होता. यावर सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया आली आहे.
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असे म्हटले होते. शरद पवार यांच्या संबंधात बोलताना मला असे बोलायचे होते की, त्यांच्या बरोबरचे सरदार चारी दिशेला धावायला लागले आहेत आणि सेनापती आसऱ्यासाठी गावगाड्याकडे यायला लागला आहे. परंतू अनावधानाने सैतान हा शब्द मुखातून गेला. गावगाड्यामध्ये सहज बोलत असतात, माझी भाषा तीच आहे. काही प्रस्थिपितांना ती कडवट लागली, असे खोत म्हणाले.
मला म्हणायचे होते सेनापती गावगाड्याकडे येत आहेत त्याला रोखुया, परत एकदा सरदारांची जमावजमव होता नये आणि शेतकऱ्याचे खळे लुटता कामा नये असे म्हणायचे होते. समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला तेव्हा शरद पवारांनी देवेंद्रवासी झाले असे म्हटले होते. त्यांना तसे म्हणायचे होते का, नव्हते म्हणायचे. त्यांना देवाज्ञा झाली, कैलासवासी झाले असे बोलायचे होते. झाले अनावधानाने. म्हणून काय तुम्ही काय गोळ्या घालता का मग, तसे असेल तर सांगा येतो तिथे, असे खोत म्हणाले.
राज्यात जे सुरु आहे त्याची कीव जनतेला आले आहे. हे नेमके कुणी सुरु केले. गुण्यागोविंदाने भाजप, शिवसेनेचे सरकार आले होते. त्याच्यात फोडाफोडी कोणी केली. ती बीजे कोणी रोवली याचाही इतिहास तपासावा लागेल. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर नागपुरमध्ये टीका केली. फडणवीस हे गावगाड्यातील लोकांचे उद्धारकर्ता आहेत. प्रस्थापितांचा कर्दनकाळ आहेत. संघर्षातून निर्माण झालेले आहेत. हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे किंवा सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत. एक कनखर, खंबीर नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेले आहे. भले आम्हाला आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण फडणवीसांचे नेतृत्व आम्ही कोणाला थांबवायला देणार नाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात खुपसायला लागलेले आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.