रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:54 PM2024-11-12T13:54:56+5:302024-11-12T13:57:11+5:30

Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवे हे नेहमी त्यांच्या बोलण्यामुळे आणि शैलीमुळे चर्चेत असतात. आता रावसाहेब दानवेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्यावरून भाजपवर टीका केली आहे. 

Sharad Pawar and Sanjay Raut taunt to bjp over raosaheb danve viral video of kicking to party worker | रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका

रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका

Raosaheb Danve Viral Video: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे नेहमी त्यांच्या शैलीमुळे चर्चेत असतात. दानवे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यावर आता विरोधकांसह नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत रावसाहेब दानवे हे अर्जून खोतकर यांचे स्वागत करत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केले. याबद्दल शरद पवार, संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. (Sharad Pawar, Sanjay Raut Reaction on raosaheb danve's viral video)

भाजपचे नेते रावसाहेब दानवे ग्रामीण बोली आणि साध्या राहणीमानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. पण, अनेकदा ते विधानामुळे आणि कृतींमुळे वादात सापडले आहेत. आता रावसाहेब दानवे यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दानवेंनी घेतली खोतकरांची भेट, कार्यकर्त्याला बाजूला करण्यासाठी...

रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांची भेट घेतली. दानवे-खोतकर भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

झालं असं की, रावसाहेब दानवे यांनी अर्जून खोतकर यांची भेट घेतली. यावेळी दानवेंनी खोतकरांना पुष्पगुच्छ दिला. फोटो काढत असतानाच एक कार्यकर्ता जवळ आला. त्यावेळी दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केलं. दानवेच्या या कृतीवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.   

शरद पवार काय म्हणाले?

रावसाहेब दानवे यांच्या या व्हिडीओबद्दल जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, "असं आहे की, त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं, त्याचं लक्षण आहे. यापेक्षा काही सांगायचं नाही", असा टोला पवारांनी भाजपला लगावला. 

याच व्हिडीओ बद्दल खासदार संजय राऊत म्हणाले, "त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारा की, हे तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? एकनाथ शिंदेंना विचारा. रावसाहेब दानवे यांच्याविषयी आम्ही कितीवेळा बोलायचं. तुम्ही त्या पक्षाचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा. कार्यकर्त्याला अशा प्रकारे लाथा घालताना तुम्हाला कसं वाटतंय, गार गार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे. काय स्थान आहे, हे दिसतंय यावरून", असा उपरोधिक चिमटा संजय राऊतांनी भाजपला काढला.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी रावसाहेब दानवे यांचा व्हिडीओ पोस्ट करत टीका केली आहे. 

"हे भाजपचे माजी मंत्री, माजी खासदार आणि बघा त्यांचा उद्धटपणा. पण, ही लाथ तुम्हाला कोणाची आठवण करून देते, काय वाटतं?", असा खोचक टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला आहे. 

'तो' कार्यकर्ता काय म्हणाला?

रावसाहेब दानवे यांनी लाथ मारून ज्या कार्यकर्त्याला बाजूला केले, त्याचे नाव शेख हमद आहे. "माझा आणि रावसाहेब दानवे यांचा ३० वर्षांचा दोस्ताना आहे. दानवे यांचे शर्ट अडकल्याने त्यांच्या कानात मी सांगितले. मात्र, त्यांना ते समजले नाही, तसेच त्यावेळी त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने दानवे यांनी मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारले. निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते", असे शेख हमद म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले? 

उपमुख्यमंत्री अजित पवार याबद्दल बोलताना म्हणाले की, "प्रत्येकाने... सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही आदर ठेवला पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही आदर ठेवला पाहिजे. सगळ्यांना मानसन्मान केला दिला पाहिजे. असं काही कुणाला जे मान्य करत नाही, जे सुसंस्कृतपणात बसत नाही, असं वागू नये. वाचाळवीरांनीही वाचाळपणा बंद करावा", असे अजित पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar and Sanjay Raut taunt to bjp over raosaheb danve viral video of kicking to party worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.