'जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत'; बच्चू कडू-शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:19 AM2023-12-28T11:19:46+5:302023-12-28T11:21:11+5:30
शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले. बंद दाराआड चर्चा.
अपक्ष असले तरी आधी महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या बंडानंतर महायुतीत गेलेल्या बच्चू कडुंची राजकीय भूमिका सध्यातरी कोणालाच कळत नाहीय. अनेकदा कडू राज्य सरकारविरोधात वक्तव्ये करत असतात. मंत्रिमंडळविस्तारात स्थान मिळाले नाही किंवा विस्तार होत नाही यावरून देखील कडूंनी सरकारविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. असे असताना आज कडू यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. यावर कडू यांना विचारले असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू, असे महायुतीत राहण्याबद्दलचे सूतोवाच कडू यांनी केले आहे.
मदतीची जाणीव म्हणून शरद पवारांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले होते. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करू, असे कडू म्हणाले.
बंद दाराआड चर्चा...
शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचा ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू आणि नयना कडू यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त शेतीवर चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते, असे कडू म्हणाले. तसेच पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे रोजगार हमी योजनेत व्हावीत, हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे हे मी सांगितल्याचे कडू म्हणाले.