Sharad Pawar Nostalgic: अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला घेऊन 'ती' माऊली सभागृहात आली होती... ; शरद पवारांनी सांगितली खास आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 06:51 PM2023-03-08T18:51:21+5:302023-03-08T18:52:05+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त दिला आठवणींना उजाळा
Sharad Pawar Nostalgic, Mother Story: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची आई शारदाबाई पवार यांच्याबाबतची एक विशेष आठवण सांगितली. शरद पवार यांच्या आईने त्यांना जन्म झाल्यावर अवघ्या तीन दिवसांचे बाळ असताना सभागृहात नेले होते. जागतिक महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने 'जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. (Women's Day Special)
"माझ्या मातोश्री स्वातंत्र्य चळवळीत होत्या. चळवळीनंतर समाजकारण हे त्यांचे लक्ष्य होते. तेव्हा जिल्हास्तरावर जिल्हा परिषद नसायची, त्या जागी ‘जिल्हा लोकल बोर्ड’ असायचं. संपूर्ण जिल्ह्यातून एक महिला प्रतिनिधी जिल्हा लोकल बोर्डावर नियुक्त केली जायची. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून माझ्या मातोश्रींची जिल्हा बोर्डावर निवड झाली होती. कधीही लोकल बोर्डाच्या बैठकीला उशीरा जायचं नाहीत किंवा गैरहजर राहायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळेच जन्म झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी माझ्या मातोश्री मला घेऊन सभागृहात गेल्या होत्या," अशी अतिशय खास आणि विशेष आठवण त्यांनी सांगितली.
"शारदाबाई गरोदर होत्या. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. बाळंतपण आटोपलं आणि लगेचच लोकल बोर्डाची बैठक होती. अशा वेळी कोणतेही कारण न देता थेट तिसऱ्या दिवशी बाळाला घेऊन त्या बारामतीवरून पुण्याला खासगी बसने गेल्या. ते तीन दिवसांचं बाळ म्हणजे मी स्वत: होतो. विधानसभा, लोकसभा आणि बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जायची मला संधी मिळाली. लहान असल्याने माझं खूप कौतुकही होत असे. जन्माच्या तिसऱ्याच दिवशी सभागृह पाहिल्यामुळे ५६ वर्षे सतत विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असं मला वाटतं नि याचं श्रेय नक्कीच मी माझ्या मातोश्रींना देईन," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या मातोश्रींना आणि समस्त महिलावर्गाला आदरपूर्वक सलाम केला.