बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 09:16 PM2018-02-21T21:16:23+5:302018-02-21T21:16:36+5:30
बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी केला आहे. ते बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरे घेत असलेल्या मुलाखतीत बोलत होते.
पुणे- बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी केला आहे. ते बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरे घेत असलेल्या मुलाखतीत बोलत होते. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई स्वतंत्र करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे का ?, असा प्रश्न राज ठाकरेंनी यांनी विचारला असता, पवारांनीही त्याला दिलखुलास उत्तर दिलं आहे.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईची गर्दी वाढणार आहे. इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण तिथूनच लोक मुंबईत येतील. बुलेट ट्रेनच्या माध्यमातूनच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, असंही पवार म्हणाले आहेत.राज ठाकरे यांनी विचारलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, बुलेट ट्रेनने मुंबईहून अहमदाबादला कोणी जाणार नाही, तर अहमदाबादहून मुंबईला येईल. त्यामुळे मुंबईची गर्दी वाढेल. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबई गमाविल्याचे दु:ख काहींच्या मनात आहे. वसई- विरारच्या पट्यात मोठ्या प्रमाणावर गुजरातीचे आक्रमण वाढत आहे. आता गुजराती पाय्याही दिसू लागल्या आहेत. काही राज्यातून लोक कष्ट करण्यासाठी येथे येतात. पण त्यांना अर्थकारणावर कब्जासाठी येथे यायचे आहे. त्यासाठी मुंबई- पुणे ही अत्यंत योग्य भूमी आहे. यासाठी आपल्याला जागृत राहावे लागेल. तुम्ही गप्प बसणार नाहीत, असेही पवार म्हणाले आहेत.
पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पडला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता. तो कार्यक्रम आज 21 फेब्रुवारीला पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात पार पडला आहे.