शरद पवारांनी किती पक्ष फोडले? त्यांना तर गोल्ड मेडल मिळेल; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:29 PM2024-08-12T18:29:55+5:302024-08-12T18:32:08+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.
BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : "लोकसभ निवडणुकीत शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती, असं मला वाटत नाही. फक्त मीडियातील लोकांनाच पवार यांच्याबद्दल राज्यात सहानुभूती असल्याचं वाटतं आणि हेच लोक सतत सहानुभूतीचा धिंडोरा पिटत असतात. शरद पवारांनी आतापर्यंत किती पक्ष फोडले? सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे, असं मला वाटतं. देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारसाहेबांना गोल्ड मेडल मिळेल," असा टोला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
'मुंबई तक'च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबाबत आपलं विश्लेषण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "लोकसभा निवडणुकीत शरद पवारसाहेबांनी अतिशय अनुभवाने आपल्या जागा निवडल्या आणि याचं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल. कुठे सरकारविरोधात वातावरण आहे, त्याचा अभ्यास करून त्यांनी जागा लढवल्या. विधानसभा निवडणुकीतही ते कमी आणि मोजक्याच जागा लढवतील, असं मला वाटतं. परंतु त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहे, असं मला अजिबात वाटत नाही. कारण सहानुभूती असती तर बीडची जागा त्यांनी फक्त ६ हजार मतांनीच का जिंकली? पवारसाहेबांच्या पक्षाने मतांचं ध्रुवीकरण करून जागा जिंकल्या," असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
पक्षफोडीच्या आरोपाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी पुन्हा आलो, पण यावेळी दोन पक्ष फोडून घेऊन आलो, असं मी एकदाच बोललो आणि तेही गंमतीने बोललो. मात्र आम्ही सातत्याने हे सांगितलं आहे की कोणीही कोणाचे पक्ष फोडू शकत नाही. त्या त्या पक्षांतील महत्त्वाकांक्षांमुळे हे पक्ष फुटले आहेत."
दरम्यान, "महाविकास आघाडीबद्दल खरंच सहानुभूती असती तर आमच्यात आणि त्यांच्या फक्त झिरो पॉइंट तीन टक्क्यांच्याच फरक कसा असता?" असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.