"आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून..."; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:16 PM2024-07-27T12:16:57+5:302024-07-27T12:31:44+5:30
Sharad Pawar : राज्यात सुरु असलेल्या आरक्षणाच्या गोंधळावरुन शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Sharad Pawar on Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्याकाही दिवसांपासून राज्यात तापला आहे. मराठा आरक्षणाची मागणी सुरु असताना राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मनोज जरांगेची मागणी आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे म्हणणं आहे. या सगळ्याबाबत आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दोघांमध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी जरांगे यांना तुम्ही आरक्षणाचा प्रश्न शरद पवार, उद्धव ठाकरे यांना का नाही विचारत असा सवाल करत आहेत. दुसरीकडे आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. मात्र आता शरद पवार यांनी आरक्षणावरुन सुरु असलेल्या गदारोळावरुन महत्त्वाचे विधान केलं आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. तिथे कटुता, अवविश्वासाचं चित्र दिसतंय आणि हे भयावह आहे. मी महाराष्ट्रात कधीही असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी मुळात संवाद ठेवायला पाहिजे. पण आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं," असं शरद पवार म्हणाले.
"दुर्दैवाने आता दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही," असेही शरद पवार म्हणाले.