"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी
By देवेश फडके | Published: January 14, 2021 05:39 PM2021-01-14T17:39:33+5:302021-01-14T17:42:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत, हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणे अपेक्षित आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. चौकशीत ते निर्देष असतील तर, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावून घेतले जाऊ शकते. ही माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भूमिका आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादीची पहिली भूमिका चाचपडणारी होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मांडली होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. संबंधित महिलेने केलेले आरोप मोठे आहेत. राजकारणात शेवटी नीतिमूल्य आणि नैतिकतेला फार महत्व आहे. राज्यात अशा घटना घडल्या किंवा प्रसंग आले, त्यावेळी संबंधित मंत्र्याकडून राजीनामा घेतल्याची अनेक उदाहरण आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचे राजीनामे घेतले होते. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. कारण आता शरद पवारांचीही भूमिका स्पष्ट झाली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर मला अधिक काही बोलायचे नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली, तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर, पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.