शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना; पडळकरांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:26 PM2020-06-24T13:26:43+5:302020-06-24T13:49:07+5:30
विविध मुद्द्यांवरून टीका करताना पडळकर यांचा तोल सुटला
मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केलं.
शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं पडळकर म्हणाले.
राज्य सरकार वेगवेगळ्या समाजांच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची केसदेखील न्यायालयात सुरू आहे. त्यासाठी तुम्ही वकील का दिले नाहीत? त्यांची फी का देत नाही? त्यांची बैठक का होत नाही? आमचे प्रतिनिधी कमी असल्यानं तुम्ही आम्हाला डावललं जातं. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समाज असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर इतर छोट्या समाजांचं काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.