"सरकार बहि‍णींना १५०० रुपये देणार पण त्यांची अब्रू..."; धुळ्यात शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 02:01 PM2024-09-15T14:01:13+5:302024-09-15T14:01:26+5:30

धुळ्यात बोलताना शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली.

Sharad Pawar criticized the Mahayuti government over the Ladki Bahin Yojana | "सरकार बहि‍णींना १५०० रुपये देणार पण त्यांची अब्रू..."; धुळ्यात शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

"सरकार बहि‍णींना १५०० रुपये देणार पण त्यांची अब्रू..."; धुळ्यात शरद पवारांचा महायुतीवर निशाणा

Sharad Pawar : विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील विविध बैठका आणि सभांमध्ये सहभागी होऊन महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. धुळ्यात पोहोचलेल्या शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारवर टीका केली. बहि‍णींची अब्रु वाचवण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

धुळ्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. तसेच लाडकी बहीण योजनेवरुनही महायुती सरकारवर शरद पवार यांनी टोला लगावला.

"राज्यात आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या २० वर्षांत काहीच विकास झाला नाही. हे सरकार बहिणींना १५०० हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. पण या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे," असं शरद पवार म्हणाले.

"आज हाच तालुका कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण आता काय दिसत आहे? सत्तेचा गैरवापर सुरु झाला. गुंडगिरी सुरु झाली. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत. दमदाटी करण्याचे प्रकार वाढले. लोकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार होऊ लागले. मात्र, सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांकडे सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो. सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणं आणि महाविकास आघाडीच्या हातात देणं हे काम तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही," असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं.
 

Web Title: Sharad Pawar criticized the Mahayuti government over the Ladki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.