एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:56 PM2023-08-17T17:56:18+5:302023-08-17T17:56:55+5:30
देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही असा आरोप शरद पवारांनी केला.
बीड - सत्ता दिलेले घटक योग्यरितीने वागत नाहीत. कुठेही काहीही घडते. आता वेळ आलीय, चुकीच्या लोकांना रोखण्याची, सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबण्याचे कुणी राजकारण करत असेल, एकदा सामुहिक शक्ती एकवटली तर असं राजकारण करणाऱ्यांची सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही असा घणाघात शरद पवारांनीभाजपा सरकारवर केला आहे.
शरद पवार म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. मणिपूर हा देशाच्या उत्तरेकडील भाग. मणिपूर, नागालँड, सिक्किम, अरुणाचल ही छोटी छोटी राज्ये परंतु महत्त्वाची आहे. या राज्याच्या शेजारी पाकिस्तान, चीन आहे. या दोन्ही देशांची नजर भारताकडे चांगली नाही. त्यामुळे सतर्क राहण्याचे काम भारतीय सैन्याला करावे लागते. मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे. दोन समाजात तणावाची परिस्थिती आहे. घरे जाळली जातायेत, स्त्रियांची धिंड काढली जातेय आणि हे सगळे होत असतानाही भाजपा सरकार कुठलेही पाऊले टाकत नाहीत. देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूरचे दु:ख समजून घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच मागच्या निवडणुकीत लोकांनी भाजपाचा पराभव करून तुम्ही निवडून आला. परंतु आज तुम्ही भाजपाच्या दावणीला जाऊन बसता. परंतु जेव्हा लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल तेव्हा लोकांना कोणते बटण दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हे ठरवले आहे. त्यामुळे अधिक बोलायची गरज नाही. मी पुन्हा येईन असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं होते. पंतप्रधानांना सल्ला आहे. मी पुन्हा येईल विधान करताना देवेंद्र फडणवीसांचा सल्ला मार्गदर्शन घ्या, आज आहे त्या पदाच्या खाली आले असंही शरद पवारांनी मोदींवर टीका केली.
दरम्यान, लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम भाजपाने केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडण्यात आली. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि केंद्राची सत्ता वापरून लोकांनी निवडलेली सरकारे पाडता. ही सगळी आव्हाने आपल्यासमोर आहेत असं शरद पवारांनी सभेत म्हटलं.