"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:48 PM2024-05-16T15:48:39+5:302024-05-16T15:51:49+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप प्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावरील टीकेची झोड कायम असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या लोकांनी लाचारी करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्रात याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिवप्रेमींसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या प्रकारावरून प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर आता शरद पवार यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली.
शरद पवार म्हणाले की, "जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे. तो जिरेटोप शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते, नाही असं नाही, पण लाचारीला काही मर्यादा असतात. त्या सगळ्या मर्यादा या लोकांनी सोडल्या आहेत," अशा शब्दांत पवार यांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं आहे.
प्रफुल्ल पटेलांनी काय खुलासा केला?
वादंगानंतर काल प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला. जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ."