"पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट..."; शरद पवारांनी लगावला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:35 AM2024-07-27T11:35:27+5:302024-07-27T12:29:14+5:30
पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानावरुन शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे.
Sharad Pawar on PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, असं विधान केलं होतं. त्याचाच आधार घेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. माझं बोट मी कोणाच्याही हातात देत नाही, असं विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. शरद पवार यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते हज हाउस येथे पार पडलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना शरद पवार यांनी आमदार राजेश टोपेंच्या भाषणातील एका वाक्यावरुन पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना राजकारणातील गुरू मानतात. त्यामुळे काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. त्याच विधानावरुन आता शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर सूचक विधान करत निशाणा साधला.
मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास - शरद पवार
"राजेश टोपे म्हणाले माझं बोट धरून राजकारणात आलो. पंतप्रधानांनीसुद्धा मागे म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्यांचं ते वक्तव्य मी अजिबात मान्य करत नाही. ते भाषणात म्हणाले होते की शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि इथवर पोहोचलो. मोदी तसं बोलल्यापासून मी कोणालाही माझं बोट धरायला देत नाही. मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कोणाच्याही हातात देणार नाही," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
अमित शाहांना प्रत्युत्तर
"मागे एकदा अमित शाह म्हणाले की शरद पवार भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. पण, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या राज्यातून तडीपार केलं होतं," असेही शरद पवार म्हणाले.