शरद पवार दिलखुलास...
By Admin | Published: December 25, 2015 03:41 AM2015-12-25T03:41:40+5:302015-12-25T10:32:28+5:30
सुमारे पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतिशील वाटचालीत महत्त्वाचा वाटा असणारे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात
सुमारे पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतिशील वाटचालीत महत्त्वाचा वाटा असणारे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ‘लोकमत’ च्या राज्यातून आलेल्या संपादकांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांना बोलते केले़ अगदी कॉलेजमधील मैत्रिणींपासून राजकारण, समाजकारण, क्रीडा अशा सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या वेधक, थेट प्रश्नांचा मारा केला़ शरद पवार यांनी तितक्याच जोरदारपणे बॅटिंग करीत या प्रश्नांना कधी मिस्कील तर कधी गंभीर होत उत्तरे दिली़ त्यांच्या या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम दोन तासांहून अधिक काळ रंगला.
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा.
प्रश्न : सलग ४८ वर्षे विधिमंडळ आणि संसदेमध्ये आपण कार्यरत आहात. जीवनाचे एकही क्षेत्र असे नाही, की ज्यात आपला वावर नाही. सहकार, शिक्षण, क्रिकेट अशा सर्वच क्षेत्रांत आपण सर्वोच्च शिखरावर आहात. आपण सर्व करीत असताना एखादी तरी गोष्ट अशी राहिली असेल, की ती आपण अद्याप पूर्ण करू शकला नसाल आणि येणाऱ्या काळात ती एक गोष्टी पूर्ण करू इच्छिता?
शरद पवार : या देशात आणि राज्यात सर्वांत मोठी समस्या आहे ती पाण्याची. ही कायमची समस्या राहणार आहे; ती वाढत जाणार आहे. पाण्याची उपलब्धता, पाण्याचा वापर आणि तो करण्यासंदर्भातील पद्धत, थेंबन् थेंब पाण्याचा संचय कसा करता येईल, त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल, त्यामध्ये समाजातील नव्या पिढीला सहभागी कसे करून घेता येईल, यासाठी कार्यक्रम राबविण्याची माझी इच्छा आहे. माझ्या या कार्यक्रमाची परिपूर्ती अद्याप झालेली नाही. हे काम अधिक लक्ष घालून करावे, याला माझे प्राधान्य राहील.
प्रश्न : संसदेची मागील दोन्ही अधिवेशने पाण्यात वाहून गेली आहेत. आपण वरच्या सभागृहात सदस्य आहात. तेथेही अडथळे निर्माण केले गेले, सभागृहही बंद पडले. ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याला काय वाटते? असे का होते आहे? हे थांबविण्यासाठी आपल्याला काय करावे लागले?
शरद पवार : सभागृहामध्ये संघर्ष झालेला मी अनेकदा पाहिला आहे. आताच राजेंद्रबाबूंनी आठवण करून दिली, की मला महाराष्ट्रात विधानसभेत आणि देशाच्या लोकसभा-राज्यसभेत जाऊन ४८ वर्षे झाली. या ४८ वर्षांत मी अनेकदा सभागृहात संघर्ष पाहिला. एखाद-दुसऱ्या प्रसंगी सभागृहाचे कामकाज बंद पाडलेलेही पाहिले आहे. पण सतत सभागृह बंद करणे, हे मी पहिल्यांदा पाहिले ते यूपीए २ मध्ये मनमोहनसिंग प्रधानमंत्री असताना. त्या वेळच्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण अधिवेशन एक मिनीटसुद्धा काम न करता पार पडले. एवढे नुकसान किंवा एवढा मोठ्या धक्का संसदीय पद्धतीला यापूर्वी कधी बसलेला नव्हता. निवडणुका झाल्या. ज्यांनी हे केले त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता जनतेने सुपूर्त केली. ज्यांना किंमत द्यावी लागली ते विरोधी पक्षामध्ये बसले. दुर्दैवाने ज्यांना किंमत द्यावी लागली, त्यांनीसुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हाच कार्यक्रम हातामध्ये घेतला. लोकसभेत असे प्रकार अनेकदा घडतात. लोकांचे प्रश्न त्यांना फेस करावे लागतात. त्याच्यातून समाधान न झाल्यामुळे होऊ शकतं. राज्यसभेत हे घडता कामा नये, अशी अपेक्षा असते. दुर्दैवानं, लोकसभा आता ठीक चालली आहे आणि राज्यसभेत असे प्रकार घडतात. शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये काम झालं. जवळपास सहा बिले मंजूर झाली; पण मला स्वत:ला ते काही आवडलं नाही. त्याचं कारण त्यातील तीन बिले चर्चा न करता मंजूर झाली. कुठलाही कायदा करत असताना विचारविनिमय न करता, चर्चा न करता मंजूर होणे, याचा अर्थ आम्ही लोकांचे प्रतिनिधित्व सगळ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देऊन करतो, असा दावा आम्हाला करता येणार नाही.
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा.
काँग्रेसचे भावी नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसचे राजकारण कसे पाहता, या प्रश्नावर ते म्हणाले, नेतृत्व करण्यासाठी आज सोनिया गांधी पुढे आहेत. सोनिया गांधी आणि माझे काही बाबतीत मतभेदही झाले. पण, हे मान्य करावे लागेल, की गांधी घराणं आणि त्यांच्या प्रतिनिधी सोनिया गांधी या काँग्रेसमधल्या सिमेंटिंग फोर्स आहेत.
समस्त काँग्रेस जनांना एकत्र ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती- एखादं कुटुंब कुठलं, असा कुठल्याही काँग्रेस जनांना प्रश्न विचारला तर ते गांधी घराण्याचे नाव घेतील. लोक टीका करतात, की त्यांची मोनोपॉली आहे का? त्या विचाराच्या लोकांची मान्यताच ज्या व्यक्तीच्या भोवती आहे, याचा अर्थ लोकशाही माध्यमातूनच त्याला त्याच्या पक्षातील लोकांचा सपोर्ट आहे. त्यांचे पुढचे प्रतिनिधी म्हणून राहुल गांधी यांच्याकडे बघितलं जातं. थोडी कमतरता आहे. एकीकडे ते विरोधकांच्या टीकेचे माध्यम आहेत, तर दुसरीकडे आठवड्यातून चार दिवस तरी देशाच्या कानाकोपऱ्यांत कुठे ना कुठे तरी जाऊन येथील लोकांमध्ये, प्रश्नांमध्ये जनसंवाद साधण्याची त्यांची धडपड चालली आहे. शेवटी व्यक्तिमत्त्व अशा अनुभवातूनच होतात.
पवारांच्या मैत्रिणींविषयी ऐकण्यासाठीची उत्सुकता
राजकीय नेत्याची आणि त्यातही पवारांसारख्या अभ्यासू नेत्याची मुलाखत घेताना सुरुवातीला राजकारण, अर्थव्यवस्था, कृषी, देश आणि राज्याचा विकास असे अनेक प्रश्न विचारले गेले. त्यांनीही अगदी मनमोकळेपणाने या सगळ््याची उत्तरे दिली मात्र शिक्षणासाठी पुण्यात असताना त्यांना मैत्रिणी नव्हत्या का? असा प्रश्न विचारला असता वातावरण हलके-फुलके झाले. याचे उत्तर देताना पवारांनी त्या काळच्या परिस्थितीचे अतिशय उत्तम वर्णन केले. बी.एम.सी.सी मध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असताना त्या काळात शिक्षणासाठी मुलींची असणारी संख्या आणि त्यातही अर्ध्याहून अधिक कँप भागातून येणाऱ्या मुलींशी इंग्रजी बोलण्याची वाटणारी भिती हे मैत्रिणी नसण्याचे कारण सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
समाजात चांगली माणसे आहेत. त्यांच्यासमोर नतमस्तक होतोच. आता यशवंतराव चव्हाण होते, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला आम्हाला काही वाटणार नाही. अशी ऋषितुल्य माणसे महाराष्ट्रातसुद्धा आहेत. मंदिरात जाण्याविरोधात मी नाही. मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जातोच. मला निवडणुकीला उभं राहायचं असतं, त्या वेळी निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी मंदिरात जावंच लागतं. (हशा)
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा.
राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात एक गोष्ट त्यांनी सांगितली. शाहू महाराजांनी एका ज्योतिष्याला पाच दिवस तुरुंगात ठेवले. तो भविष्य सांगायला आला तेव्हा, ‘‘तुला कळलं नाही का पाच दिवसांपूर्वी तुझं काय होणार आहे ते? तुला स्वत:चं कळलं नाही तर तू माझं काय सांगणार आहेस?’’ हे शाहू महाराजांचे उदाहरण मी ऐकले. मला असे वाटते, की हे अगदीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही, असे पवार म्हणाले व सभागृहात हशा पिकला.
फिल्म इंडस्ट्रीतील लोक घाबरलेत...या प्रश्नावर आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ४०-४५ निर्मात्यांबरोबर एकत्रित बैठक घेतली. त्यांचे काही जेन्युईन प्रश्न आहेत. मराठीतही चांगले चित्रपट तयार व्हायला लागले आहेत. त्यांना वाव मिळावा, त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, त्यांना मदत केली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे ठरविले आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा दुसरा काही उद्देश नाही.
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानपदाची क्षमता असणारा नेता दिसतो का? याचे उत्तर ‘‘व्यक्तिगत बोलणं योग्य दिसत नाही,’’ असे त्यांनी सांगितले. पण, देशाच्या संसदेमध्ये आलेल्या तरुण पिढीमध्ये देशहिताच्या प्रश्नावर लढण्याची आणि अभ्यास करण्याची तयारी आहे. लोकशाहीत जर त्यांना संधी मिळाली, तर देशाला चिंता करण्याची गरज नाही. अशा प्रकारे नेतृत्वाची फळी तयार होईल, जी मला संसदेत दिसते. ही माझ्या दृष्टीने अत्यंत जमेची बाब आहे, असे ते म्हणाले.